Manoj Jarange Drone : अंतरवाली सराटीत ड्रोन, विधनसभेत पडसाद
जालना: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे. मनोज जरांगे ( यांचा मुक्काम सध्या अंतरवाली सराटीच्या सरपंचांच्या घरी आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील आकाशात ड्रोन फिरताना दिसून आला आहे. सोमवारी मध्यरात्री एक ड्रोन मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) राहत असलेल्या घराभोवती घिरट्या घालत होता. मनोज जरांगे पाटील यांनी स्वत: गच्चीवर जाऊन हा ड्रोन पाहिला होता. आंतरवालीच्या गावकऱ्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली असली तरी मराठा आंदोलक हे काहीसे धास्तावले आहेत. त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी पांडुरंग तारख यांनी जरांगे यांना सरकारने झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. यासाठी पांडुरंग तारख हे आज जालन्यातील जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता सरकार मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा देणार का, हे पाहावे लागेल.
या मुद्द्यावर आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही चर्चा झाली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडला. अंतरवली सराटी गावाची ड्रोनच्या माध्यमातून टेहळणी सुरु आहे. यामुळे जरांगे पाटलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या सगळ्यामागे कोण आहे? अंतरवाली सराटी हे गाव मराठा आरक्षण आंदोलनासाठी ओळखले जाते. त्यामुळे याप्रकरणात आवश्यक असल्यास संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. गरज भासल्यास मनोज जरांगे यांना संरक्षण द्यावे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले.