Maharashtra Power Consumption : वाढत्या तापमानानं वाढवली विजेची मागणी, 18 एप्रिलरोजी गाठला उच्चांक
राज्यभरातल्या कडाक्याच्या उन्हाळ्यात तापमानात वाढ होत असताना विजेच्या मागणीनंही राज्यात उच्चांक गाठला आहे. काल १८ एप्रिलला राज्यात आजवरची सर्वाधिक विजेची मागणी आल्याचं पाहायला मिळालं. सध्याच्या कडाक्याच्या उन्हाळ्यात राज्यात पंखे, कूलर्स आणि एसीचा वापर वाढला आहे. त्यामुळं राज्यात काल आजवरच्या सर्वाधिक म्हणजे २९ हजार ११६ मेगावॅट विजेची मागणी आली. महावितरणच्या ग्राहकांकडून आजवर सर्वाधिक विजेची मागणी ही एप्रिल २०२२मध्ये आली होती. ती २४ हजार ९९६ मेगावॅट नोंदवण्यात आली होती. तो आकडा गेल्या आठवड्यात २५ हजार १०० मेगावॅट विजेच्या मागणीसह मागे पडला होता. आणि मग काल तर राज्यातल्या विजेच्या मागणीनं उच्चांक गाठला. योगायोगाची गोष्ट म्हणजे १८ एप्रिलला मुंबईतल्या विजेच्या मागणीनंही उन्हाळ्यातला उच्चांक गाठला. यादिवशी मुंबईत विजेची मागणी तीन हजार ६७८ मेगावॅटवर पोहचली होती.