Farmer Protest | शेतकऱ्यांचा देशभर चक्का जाम, महाराष्ट्रातही आंदोलनाला पाठिंबा
मुंबई: दिल्लीतील संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं आज देशभरात चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. आतापर्यंत सरकारसोबत झालेल्या अनेक बैठकांनतरही नवीन कृषी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. आजच्या या चक्का जाम आंदोलनाला महाराष्ट्रातही भरघोस पाठिंबा मिळाला आहे. राज्यातल्या विविध ठिकाणी केंद्र सरकारविरोधात निदर्शनं करण्यात आली आहेत.
शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ नागपूरात विविध संघटनांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय. नागपूरच्या इंदोरा चौकात शीख समाज आणि विविध संघटनांच्या वतीनं रस्ता रोको करण्यात आला. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला असून आंदोलकांचं रास्ता राको शांततेत सुरु आहे. यावेळी केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत अशा प्रकारची मागणी करण्यात येत आहे.
कोल्हापूरात स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. या प्रकरणी केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर पोलिसांनी राजू शेट्टी यांना ताब्यात घेतलं.
सेलिब्रेटींनी सरकारच्या निर्णयाचं समर्थन केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी म्हणाले की, "सेलिब्रिटी हे सरकारचे लाभधारक आहेत म्हणून ते टिव्ह-टिव्ह करत आहेत. पण त्यांनी लक्षात ठेवावे तुमची सेलिब्रिटी बिरुदावली ही कोट्यवधी लोकांच्या जीवावर आणि प्रेमावर तयार झाली आहे. तुम्ही स्वार्थासाठी सरकारची बाजू घेणार असाल तर तुमचं तुणतुणं बंद होईल आणि तुम्हाला कुत्रं सुध्दा विचारणार नाही."