Maharashtra Lockdown | आज राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता; अस्लम शेख यांचं मोठं वक्तव्य
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता, राज्य शासनानं बैठकींची सत्र सुरु केली आहे. आता शासनाकडून गुढी पाडव्याच्याच दिवशी मोठा निर्णय जाहीर केला जाण्याची चिन्ह आहेत. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी माध्यमांशी संवाद साधताना यासंदर्भातील माहिती दिली.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सरकार महत्त्वाच्या निर्णयावर पोहोचलं आहे. शिवाय येत्या काळात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं सर्व अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं अधिक वेळ न दवडता आता अंतिम निर्णय घेतले जाणार असल्याचे संकेत अस्लम शेख यांनी दिले.
नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असा विश्वास देत शेख यांनी शासनाकडून नवी एसओपी लागू करण्यात येण्याची बाब स्पष्ट केली. मागील लॉकडाऊनच्या वेळी अचानकच काही निर्णय घेतले गेल्यामुळं काही समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यावेळी कोरोनापेक्षाही परिस्थितीचा अधिक त्रास नागरिकांना झाला होता. त्यामुळं त्या चुका टाळण्याबाबतही यंत्रणांमध्ये चर्चा झाल्याचं ते म्हणाले.
सण- उत्सवांच्या उत्साहावरही काही मर्यादा आल्या आहेत. पण, नागरिकांनी सध्या पिरिस्थिती पाहता कोरोना काळात नियमांचं पालन करणं अपेक्षित असल्याचं म्हणत हे नियम तात्पुरते असून, त्यांचं योग्य पद्धतीनं पालन झाल्यास कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल असा सूर आळवला.