Covid 19 Vaccination | सर्वसामान्यांना लस मिळण्याबाबत आरोग्यमंत्री Rajesh Tope म्हणतात...
Corona Vaccine देशात आणि राज्यात लसीकरणाचा दिवस अखेर उजाडला आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आणि संशोधकांच्या अथक प्रयत्नानंतर देशभरात कोरोना लसींचं वितरण करण्यात आलं आहे. त्याच धर्तीवर विविध टप्प्यांमध्ये लसीकरण कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. याच लसीकरणाच्या शुभारंभासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे जालन्यात पोहोचले. तेथे त्यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधताना लसीकरण प्रक्रियेला सुरुवात होण्याबाबत आनंद व्यक्त केला.
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात येणार आहे. त्याबाबत पहिली प्रतिक्रिया देत टोपे म्हणाले, 'मागील दहा महिन्यांत ज्यांनी लाखोंच्या संख्येनं नागरिकांचे प्राण वाचवण्याचं काम केलं आज त्यांना प्राधान्यानं लस दिली जात आहे. कोरोनाच्या या काळात जवळपास 96 टक्के रुग्ण बरे करण्याचं काम आरोग्य विभागानं केलं, त्यांच्या प्रयत्नांना मी सलाम करतो'.
प्राधान्यक्रमानुसार, रुग्णवाहिका चालक, परिचारिका, डॉक्टर, वॉर्डबॉय यांना लस देण्यात येणार आहे. त्यांच्या कार्याला माझा सलामन, असं म्हणत आपल्याला, समाजासा सुरक्षितता पुरवणाऱ्या पोलीस कर्मचारी, स्वच्छतेची सेवा देणाऱ्या सफाई कर्मचारी यांना लस देत सुरक्षित करण्यावर या टप्प्यात भर देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
लसीच्या संशोधनामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या संशोधकांच्या कार्याला सलाम करत टोपे यांनी भारतीय लस ही पूर्णपणे सुरक्षित आणि स्वस्त असल्याचं सांगितलं. शिवाय लसीच्या उपलब्धतेमुळं जनतेचा जीव भांड्यातच पडला आहे, तेव्हा आता नागरिक आत्मविश्वासानं आयुष्य जगू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.