Lok Sabha Elections Result 2024 : मुंबई, चंद्रपूर ते सातारा, कोणत्या जागेवर कोण आघाडीवर? Maharashtra
मुंबई: देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. यामध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचंड चुरस पाहायला मिळत आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून उत्तर मुंबईत लोकसभा मतदारसंघाचा अपवाद वगळता इतर पाच मतदारसंघांमध्ये सातत्याने चढाओढ पाहायला मिळत आहे. विशेषत: गेल्या काही वर्षांपासून भाजपचा (BJP) बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान्य मुंबई लोकसभा (North East Mumbai Loksabha) मतदारसंघात धक्कादायक निकालाची नोंद होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी तिसऱ्या फेरीअखेर 15,348 हजार मतांची आघाडी घेतली आहे. हा भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. (Lok Sabha Election 2024)
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात यापूर्वी किरीट सोमय्या आणि मनोज कोटक यांनी प्रतिनिधित्व केले होते. या मतदारसंघात गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपच्या मिहीर कोटेचा यांचे पारडे जड मानले जात होते. मात्र, आज मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर संजय दिना पाटील हे सातत्याने आघाडीवर आहेत. भाजपने यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघातील उमेदवार बदलला होता. संजय दिना पाटील यांचा विजय झाल्यास हा भाजपसाठी मोठा धक्का ठरु शकतो.
मुंबईतील इतर मतदारसंघांमध्ये स्थिती काय?
उत्तर मुंबई मतदारसंघ वगळता मुंबईतील अन्य मतदारसंघांमध्ये प्रचंड चुरस पाहायला मिळत आहे. उत्तर मुंबईत भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली आहे. सध्याच्या घडीला त्यांच्याकडे तब्बल 38 हजार मतांची आघाडी आहे. दक्षिण मुंबईत ठाकरे गटाचे अरविंद सावंत आघाडीवर आहेत. वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकर पिछाडीवर असून रवींद्र वायकर आघाडीवर आहेत. दक्षिण मध्य मुंबईत ठाकरे गटाचे अनिल देसाई आघाडीवर आहेत, तर राहुल शेवाळे पिछाडीवर आहेत. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड पिछाडीवर असून भाजपचे उज्ज्वल निकम हे आघाडीवर आहेत.