Kolhapur Water Logging : पूर्वेला असणाऱ्या महामार्गामुळे कोल्हापुरात पाणी साचतं - बाजीराव खाडे
Kolhapur Water Logging : पूर्वेला असणाऱ्या महामार्गामुळे कोल्हापुरात पाणी साचतं - बाजीराव खाडे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या धुवाँधार पावसाने सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 84 बंधारे पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे. रविवारी संथगतीने पाण्यात वाढ झाल्यानंतर आज (22 जुलै) पहाटेपासून पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ सुरु झाली आहे. पंचगंगा नदी 39 फूट 1 इंचांवरून वाहत असून इशारा पातळी गाठली आहे. धोका पातळी 43 फूट आहे. दरम्यान, जिल्ह्यात सर्वदूर संततधार सुरु असल्याने वाहतुकीवर विपरित परिणाम झाला असून रस्तेही ओस पडत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील सर्व नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोल्हापूर शहरात काही भागांमध्ये पुराचे पाणी येऊ लागल्याने कुटुंबांना स्थलांतरित केलं जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली गेले असून कुंभी, कासारी नद्यांना सुद्धा पूर आला आहे. जिल्ह्यातील 8 राज्यमार्ग बंद आहेत. 16 प्र. जि. मार्ग बंद आहेत, तर इतर जिल्हा मार्ग 6 बंद आहेत. 14 ग्रामीण मार्गही बंद असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर, शाहूवाडी तालुक्यात मलकापूर शेजारी, जाधववाडी येथे 2 फूट पाणी आल्याने NHAI कडून महामार्ग बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्गाने अणुस्कुरा घाटातून वाहतूक सुरु होती. मात्र, तो मार्ग सुद्धा वरनमळीमध्ये बंद झाला आहे.