Maharashtra Lockdown News | लॉकडाऊनसंदर्भात कोविड टास्क फोर्सची आज सध्याकाळी 5 वाजता महत्त्वाची बैठक
मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनसारखं कडक पाऊल उचलण्याशिवाय पर्याय नाही, असं मत कालच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलं. राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयावर सर्वपक्षीय नेत्यांनी एकमत नोंदवल्याची माहिती मिळत आहे. अशातच आज कोविड टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत लॉकडाऊनच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दरम्यान सोमवार किंवा मंगळवारी लॉकडाऊनसंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळत आहे.
आज राज्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोविड टास्क फोर्सची मोठी बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर राज्यातील लॉकडाऊनसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. या बैठकीत सर्व अधिकारी उपस्थित असणार आहेत. राज्यात जर कडक निर्बंध लागू करायचे असतील, तर ते कसे लागू करता येतील आणि त्याची अंमलबजावणी कशी करता येईल, अशा महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे. कडक निर्बंध लादले तरी ते जनतेच्या हितासाठीच असतील, त्यातून जनतेला कोणत्याही प्रकारचा त्राय होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल, असं आश्वासन सरकारकडून देण्यात येत आहे.
राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काल (शनिवारी) एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते. राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी लॉकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन लागू करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.