(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Rathod यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर; भाजप नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया
मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वादात सापडलेल्या वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर केला आहे. संजय राठोड यांनी रविवारी (28 फेब्रुवारी) आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता. दरम्यान, तीन दिवस उलटले तरी संजय राठोड यांचा राजीनामा अजून मुख्यमंत्र्यांकडेच आहे का? असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, हा राजीनामा आज राज्यपालांनी मंजूर केला आहे. दरम्यान राठोड यांच्या राजीनाम्यानंतर वनमंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू झाली आहे.
रविवारी संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी आता पुढे काय अशी विचारणा केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की, राजीनामा फ्रेम करुन लावण्यासाठी घेतला नाही. त्यांचं म्हणणं असं होतं की राजीनामा लवकरच राज्यपालांकडे पाठवला जाणार आहे. मात्र, संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पोहोचलेला नसल्याच्या बातम्या समोर यायला लागल्या. यावर आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोडांच्या राजीनाम्यावर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर राज्यपालांकडे पोहचलेला राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. आता वनमंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू झाली असून अनेक नेत्यांची नावे समोर येत आहेत.