Udayan Raje meet Sharad Pawar | ... म्हणून उदयनराजे यांनी घेतली शरद पवार यांची भेट
नवी दिल्ली : राष्ट्रवादीतून काढता पाय घेतल्यानंतर शरद पवारांची भेट घेण्यासाठी भाजप खासदार उदयनराजे जाणार असल्याची माहिती समोर आली आणि अनेकांच्याच भुवया उंचावल्या. महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन महत्त्वाच्या व्यक्तींची थेट दिल्लीत होणारी भेट अनेक चर्चांना वावही देऊन गेली. अखेर खुद्द उदयनराजे यांनीच भेटीनंतर त्यामागचं खरं कारण उघड केलं.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आपण शरद पवार यांच्या भेटीला आल्याचं उदयनराजे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. पवारांच्या दिल्लीती निवासस्थानी या भेटीदरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. पवारांना भेटलात आता मोदींना भेटणार का, या प्रश्नावर हा विषय राजकारणाचा नाही असं म्हणत उदयनराजेंनी बगल देण्याचा प्रयत्न केला.
माध्यमांशी संवाद साधताना उदयनराजे म्हणाले, 'इतक्या मोठ्या प्रमाणात मराठा मोर्चे निघूनही यावेळी गायकवाड आयोग नेमण्यात आलं. त्यांनी अतिशय बारकाईनं माहिती संकलित केली, त्या धर्तीवर संपूर्ण मराठा आणि कुणबी हे वेगळे नाहीत असा निर्णय त्यांनी दिला. त्याचसोबत दोन्ही सभागृहात तो मांडण्यात आला'.