(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Winter Session : सरकारला घेरण्यास भाजप सज्ज, काल डिनर टेबलवर शिजली रणनीती
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आघाडीला घेरण्याची भाजपची रणनीती काल डिनर टेबलवर शिजली. काल रात्री भाजप आमदारांसाठी आयोजित केलेल्या भोजन कार्यक्रमात सरकारला कसं घेरायचं याबाबत देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी मार्गदर्शन केलं. नोकरभरती पेपरफुटी घोटाळ्यावरून सरकारला घेरण्याची तयारी भाजपनं केलीय. हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस. आणि आज ठाकरे सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी रणनीती तयार आहे. नोकरभरती, वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षेत झालेले घोळ यावरुन ठाकरे सरकारवर हल्लाबोल करण्याची विरोधकांची रणनिती असणार आहे. काल भाजप आमदारांची आयोजित केलेल्या भोजनावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी भाजप आमदारांना मार्गदर्शन केल्याचं कळतंय. दरम्यान परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे गेल्या सरकारशी जोडले गेले आहेत हे पुराव्यानिशी सादर करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असेल. त्यामुळं आज परीक्षा घोटाळ्यांवरुन सरकारची परीक्षा असेल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही..