(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India-China Face-Off | भारत-चीन सैन्यात पुन्हा झटापट, तीन दिवसांपूर्वी सिक्कीममध्ये संघर्ष
सिक्कीम : भारत आणि चीनमधील तणाव सातत्याने वाढत आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये पुन्हा एकदा झटापट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उत्तर सिक्कीमच्या के नाकू ला सीमेवर तीन दिवसांपूर्वी दोन्ही देशांच्या सैन्यात संघर्ष झाला. पेट्रोलिंग करणाऱ्या चीनच्या सैन्याने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भारतीय सैन्याने प्रतिकार केला. यामध्ये भारत आणि चीनचे काही सैनिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. परंतु सैन्याकडून या वृत्ताबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सध्या परिस्थिती नियंत्रणात परंतु तणावाची असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, कालच (24 जानेवारी) भारत आणि चीनमध्ये कोअर कमांडर यांच्यात 17 तासांची मॅरेथॉन बैठक झाली होती. सकाळी साडेनऊ वाजता सुरु झालेली ही बैठक रात्री अडीच वाजता संपली. चीननेच ही बैठक बोलावली होती. भारतीय सैन्याकडून लेहमधील चौदाव्या कोअर कमांडरचे लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन यांनी चर्चा केली. चीनच्या बीएमपी हट मोल्डोमध्ये झालेल्या या बैठकी नेमका काय तोडगा निघाला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सीमेवरील तणाव कमी करावा आणि सैनिक मागे घेण्यासंदर्भात ही बैठक होती.