Ro-Ro Ferry | भाऊचा धक्का-मांडवा रो रो सेवा आजपासून सुरू, प्रवाशांचा पावणेदोन तासांचा वेळ वाचणार!
मागील चार महिन्यांपासून भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी बंद असणारी रो रो सेवा आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. कोव्हिडं-19चा वाढता प्रादुर्भाव पाहता ही सेवा चार महिन्यांपूर्वी बंद करण्यात आली होती. परंतु आजपासून ही सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सेवेला नागरिकांनी देखील उत्तम प्रतिसाद दिला आहे. आज भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी जवळपास 150 नागरिकांनी प्रवास केला. याबाबत बोलताना शिपच्या संचालक देविका सेहगल म्हणाल्या की 15 मार्चला या सेवेचं उदघाटन झालं आणि काहीच दिवसांत कोरोना व्हायरस चा वाढता प्रादुर्भाव पाहता ही सेवा बंद करण्यात आली. परंतू आता मात्र ही सेवा पूर्णपणे सुरू राहणार असून याला नागरिक देखील उत्तम प्रतिसाद देतं आहेत. उद्या भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी जाण्यासाठीचे बुकिंग पूर्ण झालं आहे. या सेवेमुळे मुंबईला कामाला येणारे, रुग्णालयात येणारे यांची मोठी सोय होणार आहे.