Suresh Dhas On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या ऑपरेशननंतर भेट, तब्येतीची विचारपूस केली : धस
Suresh Dhas meets Dhananjay Munde, बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन आमने सामने आलेले भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. एबीपी माझाला सूत्रांनी ही माहिती दिली आहे. एका खासगी रुग्णालयात सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे. साधारण चार पाच दिवसांपूर्वी ही भेट झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. संतोष देशमुख यांची हत्याप्रकरणातील खंडणीच्या गुन्ह्यात धनंजय मुंडे यांचे सर्वात जवळचे कार्यकर्ते वाल्मिक कराड हे सध्या कोठडीत आहेत. सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलेलं असताना, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं आहे. मात्र आता सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आल्याने, आश्चर्य व्यक्त होत आहे.
दरम्यान, या भेटीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना, "सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या, हे सर्व सरप्राईजिंग आहे. माझ्या माहितीनुसार भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोघांमध्ये समेट घडवून आणली आहे. पण ही अतिशय गंभीर बाब आहे"
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यामध्ये गुप्तभेट झाल्याचे समोर आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सुरेश धस धनंजय मुंडेंवर अक्षरश: तुटून पडले होते. मात्र, दोघांची एका खासगी रुग्णालयात भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये समेट झालाय का? याची चर्चा देखील सुरु झाली आहे.
महाराष्ट्रात सध्याच्या राजकारणात भेटीचं महत्त्व आहे. कारण गेल्या 70-75 दिवसांत संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे या भेटीत काय घडलं? याबाबत चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, सुरेश धस यांनी मुंडेंवर आरोप केले असले तरी त्यांनी मी त्यांचा राजीनामा मागितलेला नाही, असंही त्यांनी वारंवार म्हटलं आहे.























