Zero Hour : दादांकडे पाठ, फडणवीसांची भेट; छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार?
ब्रेकनंतर तुमचं स्वागत, तुम्ही पाहताय झीरो अवर. आजच्या दुसऱ्या सत्रात आपण तुमची आणि तुमच्या पैशाच्या हिताची चर्चा करणार आहोत. मंडळी अलीकडे फोनवरून किंवा ई-मेलवरून गंडा घालण्याचे प्रकार प्रचंड वाढलेत. तुमचं नाव एका गंभीर गुन्ह्यात आलं आहे, त्याची शहानिशा करेपर्यंत आम्ही तुम्हाला अटक करतोय असा सांगणारा फोन तुम्हाला येतो ... पण ही अटक डिजिटल अरेस्ट आहे, आम्ही तुम्हाला डिजिटली अरेस्ट करतोय असं तुम्हाला सांगितलं जातं. आता डिजिटल अरेस्ट म्हणजे काय ...तर फोनवरून तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही आहात तिथेच राहा, बाहेर जाऊ नका, कुणाला फोन करून हे प्रकरण कळवू नका आणि आमची तुमच्यावर पूर्णवेळ पाळत असेल. अनेक वेळेला तुम्हाला पूर्ण वेळ फोन चार्ज करून तुम्ही आहात तिथे व्हिडियो कॉल २४ तास सुरू ठेवायला ही सांगितलं जाऊ शकतं.
मुळात, डिजिटल अरेस्ट असा काही प्रकारच कायद्यात नाही. मात्र तुमचं किंवा तुमच्या मुला-मुलीचं नाव गंभीर गुन्ह्यात आरोपी म्हणून आलंय असं सांगितल्यावर अनेक लोक घाबरून जातात, आणि बिथरलेल्या मनस्थितीत स्कॅमर्स सांगतील तसं करत जातात.
या घोटाळ्यांची व्याप्ती एवढी व्यापलीये की केवळ मुंबई शहरात सायबर फसवणूकीची रक्कम हजारकोटींपेक्षा जास्त आहे, तर महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात १ हजार १८१ कोटीं रुपये सायबर गुन्ह्यांमध्ये लुटल्या गेल्याची नोंद झाली आहे. बरं, यामध्ये केवळ अशिक्षित लोक फसतात असं नाही. निवृत्त बँक कर्मचारी, लष्करी
अधिकारी, सीए, डॉक्टर, इंजीनिअर असे उच्चशिक्षित लोक देखील मोठ्या संख्येनं या घोटाळ्यांचे शिकार बनत आहेत.
या घोटाळेबाजांच्या बोलण्यात येऊन काही लोक पैसे ट्रान्सफर करतात, आणि मग त्यांच्या लक्षात येतं की आपली फसवणूक झालीये. त्यामुळे फोन किंवा ई-मेलवरून कुणीही पैसे मागितले, तरी पैसे पाठवू नका. कुठलीही बँक, अन्य आर्थिक संस्था किंवा तपास यंत्रणा फोनवरून पैसे मागत नाही, कायद्यात तशी तरतूदच नाही हे नेहमी ध्यानात ठेवा.
या घोटाळ्यांची संख्या इतकी वाढलीये की खुद्द पंतप्रधान मोदींनी आपल्या मन की बात कार्यक्रमात याबाबत सविस्तर माहिती दिली आणि नागरिकांना सावध केला. नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी, पाहूयात.