(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जेवू घालणाऱ्यांचाच जीव घेताय का? कोल्हापूरमधील हॉटेल चालकांच्या व्यथा... लोकल चालू मग हॉटेल का बंद?
कोल्हापूर जिल्ह्यातील हॉटेल्स गेल्या 100 दिवसांपासून पूर्णपणे बंद आहेत. काही दिवसांपूर्वी केवळ पार्सल सुविधा सुरु करण्यास परवानगी मिळाली. मात्र यामुळे हॉटेल व्यवसायिक आणि या व्यवसायावर अवलंबून असणारे कामगार पूर्णपणे उध्वस्त झाले. कोल्हापुरातील सातबारा हॉटेल हे मांसाहारासाठी प्रसिद्ध हॉटेल आहे.पुणे, सातारा, सांगली, कर्नाटक या भागातून मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी खास जेवणासाठी येत असतात.
मटणाची चव चाखण्यासाठी फोनवरून बुकिंग करून नागरिक येत होते. पावसाळा सुरू झाला म्हणून हॉटेलमध्ये योग्य ती व्यवस्था केली मात्र आता ही सगळी व्यवस्था बिनकामाची ठरत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी प्रतीक्षा करून नागरिक जेवणाचा आस्वाद घेत होते त्या ठिकाणी शुकशुकाट पहायला मिळत आहे.
जर ही परिस्थिती अशीच आणखी काही दिवस सुरू राहिली तर आमच्यावर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही अशी उद्विग्न प्रतिक्रिया हॉटेल चालकांनी दिली आहे. शिवाय ज्या हॉटेल व्यवसायिक बांधवाने आत्महत्या केली आहे तसे प्रकार महाराष्ट्रात घडायचे नसतील तर लवकरात लवकर सरकारने निर्णय घेऊन आम्हाला एक प्रकारची जगण्याची संधी द्यावी अशी विनंती हॉटेल व्यवसायिकांनी केली आहे.