MLC Elections Result Special Report : 12वा प्लेअर आऊट, काँग्रेसच्या 8 आमदारांवर डाऊट? ABP Majha
मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतील व्यक्ती आणि सर्वपक्षीयांशी सुमधूर संबंध राखून असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी शुक्रवारी पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत सगळ्यांचे अंदाज चुकवत राजकीय चमत्कार करुन दाखवला. मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीच्या (MLC Election 2024) रिंगणात उतरवले होते. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे या जागेसाठी चुरशीची लढत होणार हे अपेक्षित होते. महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाकडे असलेले आमदारांचे संख्याबळ पाहता 11 व्या जागेसाठी मिलिंद नार्वेकर यांना संघर्ष करावा लागेल, असे चित्र होते. पण विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मतमोजणी सुरु झाल्यानंतर 274 मतांची 11 गठ्ठ्यांमध्ये विभागणी करण्यात आली. या मतांची मोजणी सुरु झाली तेव्हा पहिल्या टप्प्यातच मिलिंद नार्वेकर यांनी अनपेक्षितपणे मोठी आघाडी घेतली.
ही परिस्थिती पाहता मिलिंद नार्वेकर हे सर्वात पहिले विजयी होतील, असे वाटत होते. मात्र, नंतरच्या टप्प्यात मिलिंद नार्वेकर यांची गाडी 20 मतांवर जाऊन अडली. त्यानंतर मिलिंद नार्वेकर यांच्या मतांची गाडी एक-एक करुन पुढे सरकत होती. पहिल्या टप्प्यात त्यांच्यामागे असलेल्या उमेदवारांनी मुसंडी मारत विजय मिळवला. भाजपच्या योगेश टिळेकर, पंकजा मुंडे आणि अमित गोरखे यांनीही मोठी आघाडी घेत पहिल्या तासाभरातच विजय मिळवला.