T20 World Cup 2022: ग्लेन फिलिप्सच्या (Glenn Phillips) वादळी शतक आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघानं श्रीलंकेचा 65 धावांनी (NZ vs SL) पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडच्या संघानं उपांत्य फेरीचं तिकीट जवळपास निश्चित केलंय. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघानं श्रीलंकेसमोर 167 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 102 धावांत गारद झाला. न्यूझीलंडच्या विजयात ग्लेन फिलिप्स आणि ट्रेन्ट बोल्टनं (Trent Boult) महत्वाची भूमिका बजावली.
ट्वीट-
फिलिप्सनं संघाचा डाव सावरला
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघानं अवघ्या 15 धावांवर तीन विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, त्यानंतर ग्लेन फिलिप्स आणि डॅरिल मिशेल यांनी चौथ्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली. फिलिप्सनं 61 चेंडूत आपलं दुसरं टी-20 आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केलं. अखेरच्या षटकात 64 चेंडूत 104 धावा करून तो बाद झाला. त्यानं आपल्या खेळीत 10 चौकार आणि चार षटकार मारले. श्रीलंकेकडून कसून राजितानं सर्वाधिक दोन विकेट्स घेतले. तर, महिश तिक्ष्णा, धनंजय डी सिल्वा, वानिंदु हसरंगा आणि लाहिरू कुमारा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतली.
न्यूझीलंडच्या संघाची भेदक गोलंदाजी
न्यूझीलंडच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात खराब झाली. न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यापुढं श्रीलंकेच्या फलंदाजांनी लोटांगण घातलं. त्यांनी अवघ्या 8 धावांवर चार विकेट्स गमावली. न्यूझीलंडसाठी ट्रेंट बोल्टनं पॉवरप्लेमध्ये अत्यंत घातक गोलंदाजी केली. टीम साऊदीनंही त्याला दुसऱ्या टोकाकडून साथ दिली. भानुका राजपक्षेनं आपल्या संघासाठी झुंज दिली. मात्र, तो बाद होताच श्रीलंकेचा संघ डाव पत्यांसारखा ढासळला. कर्णधार दासुन शनाकानं 35 धावांची खेळी करत श्रीलंकेला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. या सामन्यात न्यूझीलंडकडू ट्रेन्ट बोल्टनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, मिचेल सँटनर आणि ईश सोढी यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स मिळवल्या. याशिवाय, टीम साऊथी आणि लॉकी फॉर्ग्युसनच्या खात्यात प्रत्येकी एक-एक विकेट्स जमा झाली.
हे देखील वाचा-