T20 World Cup 2022: आयसीसीनं ऑस्ट्रेलिया सुरु असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत रोमहर्षक ठरलेल्या पाच सामन्यांची यादी जाहीर केली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 ऑक्टोबर रोजी सुपर फेरीतील दुसरा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला गेला. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं भारताला निसटता विजय मिळवून दिला. या सामन्यातील अखेरच्या षटकात विकेट्स, नो बॉलवर षटकार, वाईड बॉल, फ्री हिटवर विकेट्स अशा अनेक थरारक गोष्टी पाहायला मिळाल्या. 


भारत पाकिस्तान सामन्यानंतर या यादीत झिम्बाव्वे पाकिस्तान (सुपर 12 फेरी), स्कॉटलँड विरुद्ध आयर्लंड (पात्रता फेरी), यूएईविरुद्ध नेदलँड्स (पात्रता फेरी), नामिबिया विरुद्ध यूएई (पात्रता फेरी) यांच्यातील सामन्यांचा आयसीसीनं आतापर्यंतच्या थरारक सामन्यात समावेश केलाय. 


1) भारताचा पाकिस्तानवर निसटता विजय
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि हार्दिक पांड्याच्या आक्रमक खेळीच्या जोरावर अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात भारतानं पाकिस्तानचा चार विकेट्सनं धुव्वा उडवला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह आणि स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याच्या भेदक गोलंदाजी करत कर्णधाराचा निर्णय असल्याचं सिद्ध केलं. पाकिस्ताननं 20 षटकात आठ विकेट्स गमावून 159 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतानं हा जिंकला.


2)झिम्बाब्वेविरुद्ध पाकिस्तानचा अवघ्या एका धावेनं पराभव
पाकिस्तानविरुद्ध गुरूवारी पर्थ स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या सामन्यात झिम्बाब्वेच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करत झिम्बाब्वेच्या संघानं निर्धारित 20 षटकात आठ विकेट्स गमावून पाकिस्तानसमोर 131 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतलेल्या पाकिस्तानच्या संघाची तारांबळ उडाली. बाबर आझम आणि रिझवान लवकर बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ स्वतःला सावरू शकला नाही. अखेरच्या षटकात 11 धावांची गरज असताना पाकिस्तानच्या संघाला अवघ्या एका धावेनं पराभव स्वीकारावा लागला. 


3) आयर्लंडचा स्कॉटलँडवर निसटता विजय
टी-20 विश्वचषकाच्या पात्रता फेरीत स्कॉटलँड आणि आयर्लंड यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळाली. पात्रता फेरीतील सामन्यात आयर्लंडनं स्कॉटलँडसमोर 177 धावांचं आव्हान ठेवलं. प्रत्युत्तरात कर्टिस कॅम्फर (72*) आणि जॉर्ज डॉकरेल (39) यांच्या वादळी खेळीच्या जोरावर आयर्लंडन हा सामना जिंकला. या सामन्यात आयर्लंडनं अवघ्या 57 चेंडूत 119 धावा करत सामन्याचं रुप बदललं.


4)अखेरच्या षटकात नेदरलँड्स यूएईवर विजय
टी-20 विश्वचषकाच्या पात्रता फेरीत यूएई आणि नेदरलँड्स यांचा एकमेकांशी सामना झाला. या सामन्यात यूएईचा संघ 20 षटकात आठ विकेट्स गमावून 118 धावाचं करू शकला. मात्र, हे लक्ष्य गाठण्यासाठी नेदरलँड्सच्या संघाची दमछाक झाली. पण अखेरच्या षटकात नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स (16*) आणि गोलंदाज लोगान व्हॅन बीक (4*) यांनी संघाला विजय मिळवून दिला. 


5) नामीबियानं यूएईच्या तोंडातून विजय हिसकावला
आयसीसीनं जाहीर केलेल्या यादीनुसार या स्पर्धेतील पाचवा रोमांचक सामना यूएई आणि नामिबिया (पात्रता फेरी) यांच्यात पार पडला. दरम्यान, 20 ऑक्टोबर रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नामिबियाची 46/5 अशी अवस्था होती. परंतु, नामिबियाचा ऑलराऊंडर डेव्हिडनं धमाकेदार खेळी करत संघाची धावसंख्या 148 वर पोहचवली. त्यानं 36 चेंडूत 55 धावा केल्या. हा सामना नामीबियानं सात धावांनी जिंकला. 


हे देखील वाचा-