Ajinkya Rahane: 'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
Ajinkya Rahane: डोंबिवलीच्या अंजिक्य रहाणेनं भारतासाठी 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 टी-20 सामने खेळले. अजिंक्य निवृत्तीची घोषणा करताना भावनावश झाला होता.

Ajinkya Rahane: टीम इंडियाचा फलंदाज अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. अजिंक्यने रहाणेनं इन्स्टावर व्हिडिओ संदेशातून हा निर्णय जाहीर केला. व्हिडिओमध्ये, 38 वर्षीय रहाणे भावूक होऊन म्हणाला की, आता पुढे जाण्याची हीच योग्य वेळ आहे. डोंबिवलीच्या अंजिक्य रहाणेनं भारतासाठी 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 टी-20 सामने खेळले. अजिंक्य निवृत्तीची घोषणा करताना भावनावश झाला होता. आता अजिंक्यच्या निवृत्तीनंतर पत्नी राधिकाने भावस्पर्शी पोस्ट करत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. पहाटेचे वर्कआउट्स आणि सराव सत्रे, सामन्यापूर्वीची धाकधुक, संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि रिकामी करणे, तुझा संयम, त्याग आणि समर्पण, ज्या प्रत्येक गोष्टीने तुझे एक क्रिकेटपटू म्हणून आयुष्य घडवले होते. हे सर्व आता संपणार आहे असा विचार करूनच मन भरून आल्याचे राधिका म्हणाली.
काय म्हटलं आहे राधिकाने?
इन्स्टा पोस्ट करत राधिका म्हणाली की, जेव्हा तू या आयपीएल (IPL) हंगामासाठी विमानतळावर जायला निघाला होतास, तेव्हा लिफ्टमध्ये जाण्यापूर्वी तू म्हणाला होतास, "चलो राड्स, शेवटच्या सीझनसाठी निघतोय. शेवटच्या वेळी हे पुन्हा एकदा करून दाखवणार आहे."
ती न संपणारी बॅग भरणे आणि रिकामी करणे
View this post on Instagram
राधिकाने पुढे म्हटलं आहे की, मी तिथेच उभी होते आणि मला नक्की काय बोलावे किंवा कशी प्रतिक्रिया द्यावी हे सुचत नव्हते. त्या एका क्षणात, जुन्या सर्व आठवणींचा पूर समोर आला... तुझा संपूर्ण प्रवास माझ्या डोळ्यांसमोरून एखाद्या चित्रपटासारखा तरळून गेला. पहाटेचे वर्कआउट्स आणि सराव सत्रे, सामन्यापूर्वीची धकधुक, संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि रिकामी करणे, तुझा संयम, त्याग आणि समर्पण… ज्या प्रत्येक गोष्टीने तुझे एक क्रिकेटपटू म्हणून आयुष्य घडवले होते.
‘अजिंक्य’ या नावाप्रमाणेच अढळ आणि अपराजित राहिलास
हे सर्व आता संपणार आहे असा विचार करूनच मन भरून आले होते. आणि आता तो क्षण अखेर आलाच आहे, तेव्हा मला फक्त तुला एवढेच सांगायचे आहे की, मला तुझा प्रचंड अभिमान वाटतो. फक्त तू मैदानात केलेल्या कामगिरीसाठीच नाही, तर या संपूर्ण प्रवासात तू एक व्यक्ती म्हणून जसा राहिलास, त्यासाठीसुद्धा. तुझ्या या प्रवासाचा एक भाग व्हायला मिळाले आणि ते इतक्या जवळून पाहायला मिळाले, याबद्दल मी खूप आभारी आहे.
तुझ्या या प्रवासाने केवळ मलाच नाही, तर क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे. तू क्रिकेटला तुझे मन आणि आत्मा दोन्ही दिले आहेस, आणि या खेळाने तुला आयुष्यभर जपता येतील अशा आठवणी दिल्या आहेत. प्रत्येक चढ-उतारात तू तुझ्या ‘अजिंक्य’ या नावाप्रमाणेच अढळ आणि अपराजित राहिलास. आयुष्याचे पुढचे पान कोणतेही असो, मी, आर्या आणि राघव नेहमीच तुझ्यासाठी जल्लोष करत राहू!
इतर महत्वाच्या बातम्या





















