डोमेस्टिक क्रिकेटचा 'सचिन' वसिम जाफरची निवृत्तीची घोषणा
वसिम जाफरने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वसिमने प्रथम श्रेणीचे तब्बल 260 सामने खेळत वसिम जाफरने 19 हजार 410 धावा केल्या. यामध्ये 57 शतकं आणि 91 अर्धशतकांचा समावेश आहे.
नवी दिल्ली : डोमेस्टिक क्रिकेकचा सचिन तेंडूलकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसिम जाफरने क्रिकेटला अलविदा केलं आहे. शनिवारी वसिम जाफरने वयाच्या 42 वर्षी क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली. यावेळी वसिमने सर्व नव्या-जुन्या सहकाऱ्यांचे आभार मानले. क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करण्याचं माझ्या वडिलांचं स्वप्न मी पूर्ण केलं, याचा मला सार्थ अभिमान आहे, असं वसिमने म्हटलं. वसिमने 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
डोमेस्टिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर वसिमने म्हटलं की, सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, अनिल कुंबळे, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग आणि एमएस धोनी यांसारख्या दिग्गज खेळाडूंसोबत ड्रेसिंग रुम शेअर करणे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. संजय मांजरेकर माझे पहिले कर्णधार होते. त्यावेळी सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, जहीर खान, अमोल मुजुमदार आणि निलेश कुलकर्णी यांसारख्या खेळाडूंसोबत ड्रेसिंग रुम शेअर करता आली हे माझ्यासाठी खास होतं.
10 फायनल, 10 रणजी विजेतेपद
वसिम जाफर 1996-97 ते 2012-13 दरम्यान 8 रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईच्या संघात सहभागी होता. तर 2018 आणि 2019 मध्ये वसिम जाफरने विदर्भाला रणजीचा किताब मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती. वसिमने गेल्या रणजी सीजनमध्ये 11 सामन्यांमध्ये 4 शतकं ठोकली होती. त्याने 69.13 च्या सरासरीने 1 हजार 37 धावा केल्या होत्या.
प्रथम श्रेणीच्या दुसऱ्याच सामन्यात त्रिशतक
वसिमने प्रथम श्रेणीच्या दुसऱ्याच सामन्यात त्रिशतक झळकावत भारतीय कसोटी संघात स्थान मिळवलं होतं. करिअरचा पहिला सामना त्याने फेब्रुवारी 2000 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. कसोटी सामन्यांमध्ये पहिलं शतक ठोकण्यासाठी त्याला सहा वर्षांचा कालावधी लागला. त्यानंतर कसोटी सामन्यात त्यानं दुहेरी शतकही झळकावलं होतं.
रणजी सामन्यांमध्ये 12 हजार धावांचा विक्रम
प्रथम श्रेणीचे तब्बल 260 सामने खेळत वसिम जाफरने 19 हजार 410 धावा केल्या. यामध्ये 57 शतकं आणि 91 अर्धशतकांचा समावेश आहे. तर दुसरीकडे 150 रणजी सामन्यात वसिमने 12 हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट हजारहून अधिक धावा
विदर्भाकडून रणजी खेळणाऱ्या वसिम जाफरने 2000 ते 2008 दरम्यान भारतासाठी 31 कसोटी सामने खेळले. यामध्ये त्याने 1 हजार 944 धावा केल्या. यामध्ये पाच शतकं आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. यादरम्यान तो काही एकदिवसीय सामनेही खेळला होता. आता वसिम जाफर आयपीएलमध्ये नव्या भूमिकेत दिसणार आहे. येणाऱ्या सीजनमध्ये वसिम किंग्स इलेव्हन पंजाबच्या फलंदाजांचा प्रशिक्षकाची धुरा सांभाळणार आहे.