IND vs SL 3rd T20 : विराट सेनेकडून पुण्यात लंकादहन, टी-20 मालिकेत दणदणीत विजय
टीम इंडियाने पुण्यातल्या एमसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या टी-20 सामन्यात श्रीलंकेचा 78 धावांनी धुव्वा उडवून दिला आहे. हा सामना जिंकत विराट सेनेने तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली.
पुणे : टीम इंडियाने पुण्यातल्या एमसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या टी-20 सामन्यात श्रीलंकेचा 78 धावांनी धुव्वा उडवून दिला आहे. हा सामना जिंकत विराट सेनेने तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. या सामन्यात भारताने श्रीलंकेला दिलेलं 202 धावांचं आव्हान श्रीलंकेला पेलवलं नाही. भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा अख्खा डाव 123 धावांत गुंडाळला. भारताकडून नवदीप सैनीनं तीन, शार्दूल ठाकूरनं दोन आणि वॉशिंग्टन सुंदरनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला होता. या सामन्यात टीम इंडियाने वीस षटकांत सहा बाद 201 धावांची मजल मारली होती. त्यात सलामीच्या लोकेश राहुल आणि शिखर धवनच्या अर्धशतकांचा मोलाचा वाटा होता. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. धवनने 52 तर राहुलने 54 धावा केल्या. हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर भारताच्या मधल्या फळीने निराशा केली.
पंतला विश्रांती देऊन संघात संधी मिळालेल्या संजू सॅमसनला केवळ 6 धावा करता आल्या. यानंतर श्रेयस अय्यरही (04) झटपट माघारी परतला. कर्णधार विराट कोहली 26 धावा करुन माघारी परतला. अखेरच्या षटकात जोरदा फटकेबाजी करत मनिष पांडे (18 चेंडूत 31) आणि शार्दुल ठाकूरने (8 चेंडूत 22) टीम इंडियाला 200 धावांचा टप्पा पार करुन दिला.
त्यानंतर 202 धावांचं आव्हान घेऊन मैदातनात उतरलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगलेच जखडून ठेवले होते. लंकेचे पहिले 4 फलंदाज अवघ्या 26 धावांत माघारी परतले. यानंतर अँजलो मॅथ्यूज (31) आणि धनंजय डी-सिल्वा (57) यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ही जोडी माघारी परतल्यानंतर लंकेचा डाव पुन्हा एकदा कोलमडला.
Saini picks up his THIRD. Sri Lanka are all out for 123 runs.#TeamIndia win by 78 runs and win the series 2-0 👏🎉#INDvSL pic.twitter.com/5XwoXPeNBx
— BCCI (@BCCI) January 10, 2020