एक्स्प्लोर
स्पेशल रिपोर्ट : धर्माची बंधनं झुगारून ते एक झाले
टीम इंडियाचा माजी गोलंदाज झहीर खान अखेर बोहल्यावर चढला आहे.
कोल्हापूर/मुंबई : भारताचा माजी क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे हे प्रेमी युगुल धर्माची सारी बंधनं झुगारून एक झालं. विशेष म्हणजे त्या दोघांनी आपल्या लग्नात धार्मिक रितीरिवाजांना थारा न देता, नोंदणी पद्धतीने विवाह केला. झहीरने नोंदणी विवाहासाठी हलक्या गुलाबी रंगाचा कुर्ता परिधान केला होता. अतिशय साध्या पोशाखातही तो मोठा रुबाबदार दिसत होता. सागरिकाने तपकिरी रंगाचा एम्ब्रॉयडरी केलेला ब्लाऊज आणि लाल साडीला पसंती दिली होती. गळ्याशी घट्ट बसणारा नेकलेस आणि त्यावर मॅचिंग अशा इयररिंग्जमध्ये ती खूप गोड दिसत होती.
भारतीय क्रिकेटचा हॅण्डसम हन्क झहीर खान आणि चक दे गर्ल सागरिका घाटगेचं लग्न अधिक वैशिष्ट्यपूर्ण ठरलं. कारण निकाह किंवा सप्तपदीचा पर्याय टाळून झहीर आणि सागरिकाच्या नोंदणी पद्धतीने झालेल्या विवाहात एकमेकांना आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकारलं.
टीम इंडियाच्या 2011 सालच्या विश्वचषक विजयाचा हीरो झहीर खान आणि मराठी-हिंदीत मोजकेच चित्रपट करणारी सागरिका घाटगे यांची ओळख एका कॉमनफ्रेण्डने करुन दिली. त्या ओळखीची गाडी डेटिंग आणि प्रेमाच्या स्टेशन्सवरून आज थेट मॅरेज रजिस्ट्रारसमोर जाऊन उभी राहिली. झहीर आणि सागरिकाच्या विवाहाने... श्रीरामपूर आणि कोल्हापूरची दोन मराठी कुटुंबं एक झाली. धर्माचं कोणतंही बंधन त्या विवाहाच्या आड आलं नाही. त्यांच्या विवाहानं क्रिकेट आणि बॉलिवूडच्या नात्याची आणखी एक लग्नगाठ घट्ट झाली.
क्रिकेट आणि बॉलिवूडमधल्या नात्याची परंपरा ही अनेक वर्षांची आहे. अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं तर हरभजनसिंग आणि गीता बसरा... युवराजसिंग आणि हेजल कीच या प्रेमी युगुलांनी विवाहबंधनात अडकून क्रिकेट आणि बॉलिवूडचं युगायुगाचं तेच नातं घट्ट केलं होतं.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या लव्हबर्डसना तर सारा देश आज हॉट कपल म्हणून ओळखतो. खुल्लमखुल्ला प्यार करेंगे हम दोनो... इस दुनिया से नही डरेंगे हम दोनो...असं आपल्या कृतीतून सांगणारी ही जोडीही लवकरच एकमेकांना आयुष्यभराची साथ देण्याच्या आणाभाका घेणार आहे असं कळतंय.
क्रिकेट आणि बॉलिवूडमधल्या अनेक जोड्यांनी याआधीही साथ जियेंगेच्या शपथा घेतल्या होत्या. त्यात कुणाचं प्रेम सफल झालं, तर कुणाचं असफल. कुणी कुणी तर स्टेटस सिम्बॉल म्हणूनही एकमेकांची सोबत केली. झहीर खान-ईशा शर्वाणी, मोहम्मद अझरुद्दिन-संगीता बिजलानी, युवराजसिंग-किम शर्मा, वासिम अक्रम-सुश्मिता सेन, रवी शास्त्री-अमृता सिंग, सौरव गांगुली-नगमा, इम्रान खान-झीनत अमान, व्हिव रिचर्डस-नीना गुप्ता, मोहसीन खान-रिना रॉय, अंजू महेंद्रू-गॅरी सोबर्स ही नावं प्रेमी युगुल म्हणून जितकी गाजली तितकंच त्यांच्यामधलं नातं विस्मृतीतही गेलं. पण काळाच्या साऱ्या कसोट्यांवर तावून सुलाखून अमरप्रेम म्हणून गाजलं आणि यशस्वीही ठरलं ते टायगर पतौडी आणि शर्मिला टागोर यांच्यामधलं नातं. त्या दोघांच्या प्रेमात जसा धर्म आड आला नाही. तसंच झहीर खान आणि सागरिका घाटगेनंही धर्माची सारी बंधनं झुगारून एकमेकांना स्वीकारलं. त्या दोघांनी निकाह किंवा सप्तपदीची वाट पसंत केली नाही. पण भविष्यात त्यांनी टायगर पतौडी आणि शर्मिला टागोर यांच्या नांदा सौख्यभरे मार्गानं जावं, याच त्यांच्या चाहत्यांकडून त्यांना शुभेच्छा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement