Indonesia Open 2022 : भारताला मोठा धक्का, सायना-कश्यपने इंडोनेशिया ओपनमधून घेतली माघार
Indonesia Open 2022 : सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांच्यासह एचएस प्रणॉय यांनी मंगळवारपासून सुरू होणाऱ्या इंडोनेशिया ओपन सुपर सीरिज 500 मधून माघार घेतली आहे.
Indonesia Open 2022 : भारतीय बॅडमिंटनमधील स्टार जोडी सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांच्यासह नुकत्याच झालेल्या थॉमस चषक स्पर्धेत ऐतिहासिक विजयाचा नायक असलेल्या एचएस प्रणॉय यांनी मंगळवारपासून सुरू होणाऱ्या इंडोनेशिया ओपन सुपर सीरिज 500 मधून माघार घेतली. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी भारताची पहिली बॅडमिंटनपटू सायनाने वर्कलोड मॅनेजमेंटचा हवाला देत माघार घेतली तर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरलेला कश्यप अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही.
कश्यप म्हणाला, “निवड चाचणीपूर्वी मला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती आणि ती बरी होण्यासाठी सात आठवडे लागले. यानंतर त्याच्या घोट्याला दुखापत झाली. आता मी ठीक आहे पण पूर्णपणे तंदुरुस्त नाही. शिवाय खूप स्पर्धा होणार असल्याने सायनाने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
प्रणॉय म्हणाला, मी इंडोनेशियामध्ये खेळणार नाही. मी पुढची स्पर्धा खेळेन. मी तंदुरुस्त आहे आणि पुढील स्पर्धांसाठी उत्सुक आहे. या विजयाने भारतीय खेळाडूंचे मनोबल उंचावले आहे.
जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या लक्ष्य सेनला या स्पर्धेत सातवे मानांकन मिळाले आहे. डेन्मार्कच्या हॅन्स-क्रिस्टियन सोलबर्ग विटिंगसविरुद्ध तो आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. या दोघांमधील दोन सामन्यांमध्ये प्रत्येक वेळी सेनच्या पदरी निराशाच आली आहे.
दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती सिंधू थायलंड ओपनच्या उपांत्य फेरीतून बाहेर पडल्यानंतर यावेळी आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. डेन्मार्कच्या रेखा क्रिस्टोफरसनविरुद्ध ती आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. पुरुष दुहेरीत मनू अत्री आणि बी सुमीथ रेड्डी यांचा सामना पहिल्या फेरीत स्थानिक खेळाडू प्रमुद्या कुसुमवर्धन आणि येरेमिया एरिच योचे याकुब रामबितान यांच्याशी होईल.
महिला दुहेरी प्रकारात दोन भारतीय जोड्या आहेत. अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी या 22 व्या मानांकित जोडीचा सामना ब्राझीलच्या जॅकलिन लिमा आणि सामिया लिमा यांच्याशी होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात सिमरन सिंघी आणि रितिका ठकार दक्षिण कोरियाच्या ली सो ही आणि शिन सेउंग चॅन या जोडीविरुद्ध खेळतील.