Russia Sports Ban : रशियानं युक्रेनशी युद्ध पुकारलं आणि जगभरातील विविध क्षेत्रांवर याचा परिणाम होऊ लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर रशिया-युक्रेन वादामुळे बऱ्याच चर्चांना उधान आलं असून कुठे न कुठे बऱ्याच देशांना कोणत्या न कोणत्या कारणामुळे याचा फटका बसत आहे. नुकताच मूळचा भारतीय असणाऱ्या एका विद्यार्थ्याचा या युद्धात सुरु असलेल्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. दरम्यान या सर्वाचे पडसाद क्रीडविश्वावर उमटत असून बऱ्याच मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून रशियाला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये फिफा फुटबॉल विश्वचषक, युएफा चॅम्पियन्स लीग, फॉर्म्युला वन शर्यत अशा मोठ्या स्पर्धांचा समावेश आहे.


 रशियाने युक्रेनवर हल्ला केला असून आज युद्धाचा सहावा दिवस आहे. या युद्धाचे पडसाद अर्थव्यवस्था, जागतिक वाहतूकीसह सर्वच क्षेत्रांवर होत आहेत. खेळांच्या जगावरही याचे पडसाद उमटू लागले असून क्रीडाविश्व रशिया आणि उर्वरित जग अशा दोन गटात विभागलं जाण्याची शक्यता आहे. रशियाच्या युक्रेनवर हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रसिद्ध फुटबॉल स्पर्धा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्याचं ठिकाण बदलण्यात आलं. आधी या स्पर्धेचा अंतिम सामना रशियातील प्रसिद्ध फुटबॉल स्टेडियम सेंट पीटर्सबर्ग येथे होणार होता. पण आता हे ठिकाण बदलून पॅरिस करण्यात आलं आहे. त्यानंतर लगेचच प्रसिद्ध रेसिंग स्पर्धा फॉर्मुला 1 (Formula 1) ची रशियातील रशियन ग्रँड प्रिक्स स्पर्धा ही रद्द करण्यात आल्याचं ट्वीट करत कळवलं. अशाप्रकारे बऱ्याच महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धातून रशियाला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. 


या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये रशियावर बंदी



  • फुटबॉल विश्वचषक फिफाकडून (FIFA) आगामी विश्वचषकात बंदी

  • युरोपियन फुटबॉल असोसिएशनची अर्थात युएफाकडून (UEFA) बंदी

  • ज्युदो महासंघातून पुतीन बडतर्फ

  • रशियातील स्कीईंग, फॉर्म्युला वन शर्यत रद्द

  • चॅम्पियन्स लीग फायनलचं यजमानपद रशियाकडून पॅरिसकडे

  • जागतिक अॅथलेटिक्समध्येही रशियावर बंदीची शक्यता


रशियाचं क्रीडाभविष्यावर प्रश्नचिन्ह


वेगवेगळ्या खेळांमध्ये रशियावर बंदी टाकण्याच्या कारवाईमुळे रशियासमोर आता अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. यापुढे रशियात एकही आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार नाही. तसंच रशियन खेळाडूंना आपल्या राष्ट्रध्वजाखाली खेळता येणार नाही. त्यामुळं क्रीडाप्रेमी असलेले पुतीन एकटे पडण्याची शक्यता आहे.


महत्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha