Assembly election 2022 : सध्या देशातील पाच राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. पंजाब, गोवा आणि उत्तराखंडमधील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झाले असून, मणिपूरमध्ये मतदानाचा पहिला टप्पा पार पडला आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या काळात पाच राज्यातून तब्बल 1 हजार कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. सर्वात जास्त रक्कम ही पंजाब राज्यातून जप्त करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. 


निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये 1,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. यामध्ये सर्वात जास्त रक्कम ही पंजाबमध्ये जप्त करण्यात आली आहे. पंजाबमधून तब्बल 510.91 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश 307.92 कोटी आणि मणिपूर 167.83 कोटी यांचा क्रमांक लागतो. उत्तराखंडमधील निवडणुकीदरम्यान 18.81 कोटी रुपये आणि गोव्यात 12.73 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.


एकूण 1 हजार 18.20 रुपयांच्या जप्तीमध्ये 140.29 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तर 99.84 कोटी रुपयांची दारु, 569.52 कोटी रुपयांची औषधे, 115.05 कोटी रुपयांचे मौल्यवान धातू आणि 93.55 कोटी रुपयांच्या इतर वस्तूंचा समावेश आहे. पंजाबमधून 376.19 कोटी रुपयांचे नशेसी पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने सीबीडीटी, सीबीआयसी, एनसीबी, उत्पादन शुल्क यांसारख्या अंमलबजावणी संस्थांच्या प्रमुखांसह आणि सीमावर्ती राज्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह अनेक बैठका आयोजित केल्या होत्या. यामध्ये निवडणूक असलेल्या राज्यांमध्ये 'प्रलोभनमुक्त' निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी संपूर्ण रोडमॅप तयार केला गेला होता. तरी देखील या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर करण्यात आला आहे.


दरम्यान, पंजाब, गोवा आणि उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. तर उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे पाच टप्पे पूर्ण झाले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 3 मार्चला सहावा आणि 7 मार्चला शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे. मणिपूरमध्ये एक टप्पा पार पडला आहे. दुसरा टप्पा 5 मार्च रोजी पार पडणार आहे. सर्व राज्यांतील मतमोजणी 10 मार्च रोजी होणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या: