लखनौ : महाराष्ट्राच्या राजकारणात ईडी हा शब्द अगदी परवलीचा बनला आहे. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. यामध्येही ईडीचं कनेक्शन समोर आलं आहे. भाजपच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाच्या एका माजी अधिकाऱ्याची सध्या जोरदार चर्चा आहे. ईडीचे माजी सह संचालक राजेश्वर सिंह भाजपचे उमेदवार आहेत. एबीपी माझाला दिलेल्या धमाकेदार मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्रातील ईडीची कारवाई, भाजपची निवड का केली यावर भाष्य केलं. 2G, एअरसेल मॅक्सिसपासून ते चिदंबरम यांसारखी हायप्रोफाईल प्रकरणं राजेश्वर सिंह यांनी हाताळली आहेत.
 
महाराष्ट्रातील अनेक नेत्यांवर झालेल्या ईडीच्या कारवाईवरुन विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. खोटे आरोप करुन करुन महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यातच ईडीचे माजी अधिकारी राजेश्वर सिंह यांना भाजपकडून तिकीट मिळाल्यानंतर त्यांचं आणि भाजपचं कनेक्शन असल्याचा आरोप अनेक नेत्यांनी केला. याबाबत बोलताना राजेश्वर सिंह म्हणाले की, "विरोधकांकडे बोलण्यासारखं काही नसलं की ते असे आरोप करतात. तसंच "त्यांचं सरकार असताना सुद्धा ईडी काम करत होती ना," असंही त्यांनी म्हटलं.


एका माणसाला तुम्ही तुरुंगात टाकता दुसरा बाहेर येतो. भ्रष्टाचार केवळ एकेकाला जेलमध्ये टाकून संपणार नाही. जेलमध्ये गेले तरी त्यांचे नातलग किंवा ते लढत राहतात. त्यामुळे काही सुधारणांची आवश्यकता आहे असं वाटलं. माझ्या अनुभवाचा उपयोग मी चांगले कायदे आणण्यासाठी करु शकतो असं वाटलं, असा विश्वास राजेश्वर सिंह यांनी व्यक्त केला.


...म्हणून भाजपची निवड : राजेश्वर सिंह
निवडणुकीसाठी भाजपची निवड का केली? भाजपा माफियामुक्त आहे का? या प्रश्नावर राजेश्वर सिंह म्हणाले की, "भाजपचं व्यक्तित्व आणि नेतृत्व चांगलं आहे. ज्या उत्तर प्रदेशात जंगलराज, गुंडाराज होतं तिथे कानून राज आणलं. भाजप जे बोलते ते करुन दाखवते. विचारधारा राष्ट्र प्रथम ही आहे."


"ईडी एक प्रोफेशनल एजन्सी आहे. कुठलेही काम कायद्याच्या अंतर्गतच करावं लागतं. आमचं काम कोर्ट मॉनिटर करतं, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन निगराणी करतं. तुमच्याकडे कोर्ट आहे." मग आरोप करण्यापेक्षा कोर्टात जा असा सल्ला देताना यांचे कुठलेच आरोप कोर्टात का नाही टिकत? असा सवालही त्यांनी विचारला.


पीएमएलए कायदा नवीन आहे अनेक ठिकाणी ट्रायल्स आहेत. थोडा वेळ लागेल पण कन्व्हेक्शन रेट कमी आहे असं नाही. ईडीकडे वर्कलोड खूप आहे, एखादी केस लवकर सुरु होते, एखाद्या केसला वेळ लागतो पण पूर्णपणे निष्पक्षपणे काम करते. पुराव्याशिवाय ईडी कुठलं काम करत नाही, असा दावा राजेश्वर सिंह यांनी केला.