एक्स्प्लोर
पदार्पणातच्या मालिकेत षटकार ठोकून रिषभचं पहिलं शतक साजरं
विशेष म्हणजे रिषभने हे शतकही षटकारानेच पूर्ण केलं. षटकार ठोकत कसोटीत शतक पूर्ण करणारा रिषभ चौथा भारतीय खेळाडू ठरला.

लंडन : षटकाराने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या रिषभ पंतने ओव्हल कसोटीत भारताच्या दुसऱ्या डावात शानदार शतक पूर्ण केलं. विशेष म्हणजे रिषभने हे शतकही षटकारानेच पूर्ण केलं. षटकार ठोकत कसोटीत शतक पूर्ण करणारा रिषभ चौथा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी कपिल देव, इरफान पठाण आणि हरभजन सिंह यांच्या नावावर हा विक्रम होता. रिषभचं शतक साजरं होताच दिग्गज यष्टीरक्षक आणि ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू अॅडम गिलख्रिस्टनेही त्याचं अभिनंदन केलं आणि शुभेच्छा दिल्या. पदार्पणाच्या मालिकेत रिषभचे विक्रम या कसोटीत रिषभने विविध विक्रमांची नोंद केली आहे. षटकाराने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात करणं असो, किंवा एका सामन्यात सर्वाधिक झेल घेणं असो. पहिलीच मालिका त्याने गाजवली. दरम्यान, खराब यष्टीरक्षणामुळे त्याला टीकेचा सामना करावा लागला. चौथ्या कसोटी सामन्यात तर एक नकोसा विक्रम त्याच्या नावावर झाला होता. धोनीचा विक्रम मोडित यापूर्वी रिषभ पंतने आणखी एका विक्रमाची नोंद केली. इंग्लंडमध्ये खेळताना एका डावात सर्वोच्च धावसंख्या उभारणारा तो पहिलाच यष्टीरक्षक फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम टीम इंडियाचा माजी कसोटी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नावावर होता. धोनीने ओव्हलच्याच मैदानावर 2007 मध्ये खेळताना 92 धावा केल्या होत्या. शतकी खेळी करणाऱ्या रिषभने हा विक्रम मोडित काढला. SENA मध्ये सर्वाधिक धावा SENA म्हणजे दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या आशियाबाहेरच्या चार महत्त्वाच्या देशांमध्ये सर्वोच्च धावसंख्या उभारणारा रिषभ पहिलाच भारतीय यष्टीरक्षक ठरलाय. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (सेन्चुरियन) धोनीची 90 ही सर्वोच्च धावसंख्या होती. फारुख इंजिनियर यांनी अॅडिलेड कसोटीत ऑस्ट्रेलियात 89 धावा केल्या होत्या. तर सय्यद किरमानी यांनी न्यूझीलंडमध्ये 78 एवढी धावसंख्या उभारली होती. षटकार ठोकत खातं उघडलं कसोटी क्रिकेटमध्ये षटकार लगावत सुरुवात करणारा रिषभ पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकाराने आपलं खातं खोलणारा रिषभ जगातील बारावा खेळाडू ठरला. एकाच सामन्यात सर्वाधिक झेल आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेल्या ऋषभ पंतने मात्र या सामन्यात कमाल केली. त्याने यष्टिरक्षक म्हणून पाच झेल घेतले, जो एक विश्वविक्रम आहे. पदार्पणाच्या सामन्यात एकाच डावात पाच झेल घेणारा तो आशियातील पहिलाच यष्टिरक्षक ठरला आहे.
आणखी वाचा























