22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यात भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ पहिल्यांदाच गुलाबी चेंडूसोबत खेळताना दिसणार आहेत. भारतात याआधी दुलीप करंडकात गुलाबी चेंडूचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्यात आला होता. पण भारतातल्या कसोटी सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Ajinkya Rahane | डे नाईट कसोटीआधी पिंक बॉल शेजारी ठेवलेला अजिंक्य रहाणेचा मजेशीर फोटो व्हायरल | ABP Majha
बीसीसीआय अधिकाऱ्यांनी असा दावा केला आहे की, मैदानावर रिवर्स स्विंगसाठी हा चेंडू फायदेशीर ठरणार असून त्यासाठी या चेंडूची शिलाई हाताने करण्यात आली आहे. हाताने शिलाई करण्यात आलेला बॉल रिवर्स स्विंगसाठी फायदेशीर ठरतो. अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले की, 'गुलाबी चेंडू हाताने शिवून तयार करण्यात आला आहे. जेणेकरून हा अधिकाधिक स्विंग होण्यास मदत होईल.'
असा तयार करण्यात आला पिंक बॉल :
एस जी च्या मीरतमधील फॅक्टरीमधून कोलकातामध्ये होणाऱ्या डे-नाईट कसोटीसाठीचे चेंडू बनवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे एस जीनं पहिल्यांदाच गुलाबी चेंडूंचं उत्पादन केलं आहे.
चेंडूचा रंग बदलल्यानं उत्पादनाच्या प्रक्रियेतही कमालीचा बदल झाला आहे. सामान्यत: लाल चेंडू बनवण्यासाठी फक्त दोन दिवसांचा कालावधी लागतो. पण गुलाबी चेंडू तयार होण्यासाठी तब्बल आठ दिवस लागतात.
लाल चेंडूसाठी लागणारं लेदर त्याच रंगात उपलब्ध असतं. पण गुलाबी चेंडूसाठी लेदरवर रंगद्रव्य चढवून ते तयार व्हायलाच सहा दिवसांचा कालावधी जातो. आणि मग त्यानंतर सुरु होते ती चेंडू बनवण्याची प्रक्रिया.
धोनीमुळे 2011च्या विश्वचषकात माझं शतक हुकलं - गौतम गंभीर
चेंडूला चामड्याच्या कटिंगने शिवण्यात येतं आणि त्यावर पुन्हा एकदा रंग देण्यात येतो. त्यावर पुन्हा शिलाई करून हा चेंडू तयार केला जातो. चेंडूच्या आतील भागाची शिलाई आधी करण्यात येते आणि त्यानंतर बाहेरच्या भागाची शिलाई करण्यात येते.
चेंडू तयार झाल्यानंतर रात्रीच्या वेळी फ्लडलाईट्समध्ये तो स्पष्ट दिसावा यासाठी या चेंडूवर लाल चेंडूपेक्षा जास्त वेळा रंगद्रव्याचा थर दिला जातो. त्यामुळे तयार झाल्यानंतर गुलाबी चेंडूला लाल चेंडूपेक्षा जास्त लकाकी मिळते आणि त्यासोबतच स्विंग सुद्धा होतो.