Neeraj Chopra : ऑलिम्पिकवीर नीरज चोप्राची कमाल, ऑलिम्पिकमधील कामगिरीसह स्वत:चाच राष्ट्रीय विक्रमही मोडला, फिनलँडमध्ये रचला इतिहास
Neeraj Chopra : भारताचा ऑलिम्पिकवीर नीरज चोप्राने पुन्हा एकदा धमाकेदार कामगिरी केली आहे. नीरजने फिनलँड येथील स्पर्धेत 89.30 मीटर अंतरापर्यंत भाला फेक केली. मात्र, त्याला या स्पर्धेत सुवर्णपदकाने हुलकावणी दिली.
Neeraj Chopra : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक क्रीडा प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घालून इतिहास रचणारा ऑलिम्पिकवीर नीरज चोप्राने पुन्हा एकदा धमाकेदार कामगिरी केली आहे. नीरज चोप्राने आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. नीरजने फिनलँडमध्ये झालेल्या नुरमी गेम्समध्ये हा विक्रम केला आहे. नीरजने या स्पर्धेत 89.30 मीटर अंतरापर्यंत भालाफेक केली. नीरजची ही कामगिरी ऑलिम्पिकमधील कामगिरीपेक्षाही सरस ठरली. मात्र, नीरजला या स्पर्धेत सुवर्णपदकाने हुलकावणी दिली.
ऑलिम्पिकनंतर जवळपास 10 महिन्यानंतर नीरज चोप्रा एका स्पर्धेत सहभागी झाला. ही त्याची पहिलीच स्पर्धा होती. आपल्या पहिल्या प्रयत्नात त्याने 86.92 मीटर थ्रो केला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने 89.30 मीटर थ्रो केला. त्यानंतर तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या प्रयत्नात त्याने जोरदार प्रयत्न केले. मात्र, या प्रयत्नात 85.85 मीटर इतकाच थ्रो फेकता आला.
Olympic Champion Neeraj Chopra settles for a Silver Medal with a New National Record Throw of 89.30m at the Paavo Nurmi Games in Finland.@afi We can see several performance hikes in various events this season. Hope for more further. @Adille1 @Media_SAI @SPORTINGINDIAtw pic.twitter.com/cBLg4Ke8nh
— Athletics Federation of India (@afiindia) June 14, 2022
फिनलँडमधील स्पर्धेत 25 वर्षीय ऑलिव्हर हेलँडर या फिनलँडच्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले. त्याने 89.83 मीटर भाला फेक करत सुवर्णपदकावर नाव कोरले. या सर्वोत्तम कामगिरीशिवाय, त्याने 88.02 मीटर आणि 80.36 मीटर अशी कामगिरी नोंदवली.
नीरज चोप्रा हा फिनलँडमधील वर्ल्ड अॅथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूरमध्ये सहभागी झाला होता. जागतिक पातळीवर डायमंड लीगनंतरची ही प्रतिष्ठेची स्पर्धा समजली जाते.
चोप्राचा यापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम 88.07 मीटर होता. हा विक्रम त्याने मागील वर्षी मार्चमध्ये पटियाला येथे नोंदवला होता. त्याने 7 ऑगस्ट 2021 रोजी टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर भाला फेक करत सुवर्ण पदक जिंकले. फिनलँडमधील स्पर्धेतील कामगिरीमुळे नीरजचा आत्मविश्वास दुणावला असणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकुल स्पर्धेत त्याच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.