एक्स्प्लोर
'माझा कट्ट्या'वर अभिजीतचं आश्वासन, ऑलिम्पिक पदक जिंकणारच!
अभिजीत कटके आणि त्याचे वस्ताद अमरसिंह निंबाळकर यांनी आज माझा कट्टावर मनमोकळ्या गप्पा मारल्या.

मुंबई: महाराष्ट्र केसरी जिंकली मात्र त्यात अडकून राहणार नाही. यापुढे माझं लक्ष्य ऑलिम्पिक पदक जिंकण्याचं आहे, त्यादृष्टीने माझे प्रयत्न सुरु आहेत, असं महाराष्ट्र केसरी विजेता अभिजीत कटकेने सांगितलं. अभिजीत कटके आणि त्याचे वस्ताद अमरसिंह निंबाळकर यांनी आज माझा कट्टावर मनमोकळ्या गप्पा मारल्या. किरण कुंडी डाव टाकणार हे माहीत होतं गेल्या वर्षी थोडक्यात हुकलं होतं, यंदा ठरवलं होतं, काहीही केलं तरी महाराष्ट्र केसरी सोडायची नाही. त्यादृष्टीने माझे प्रयत्न सुरु होते. गेल्या वर्षभरात मी अन्य पैलवानांचे व्हिडीओ पाहून डावपेच आखत होतो. किरण भगत हाच फायनलमध्ये येणार असा अंदाज होता, इतकंच नाही तर किरण मला फायनलमध्ये कुंडी डाव टाकणार हेही आधीच माहीत होतं. त्यामुळे मी तशी तयारी केली होती, असं अभिजीत कटकेने सांगितलं. शाळा शिकला नाहीस तरी चालेल, महाराष्ट्र केसरीची गदा हवी वडिलांनी आपल्याकडून कशी तयारी करुन घेतली, हे यावेळी अभिजीतने सांगितलं. शाळा नाही शिकला तरी चालेल, पण महाराष्ट्र केसरीची गदा जिंकायची, हे वडिलांनी सांगितलं होतं. तसंच इतर मुलांप्रमाणे गाड्या-मोबाईलमध्ये न रमता, महाराष्ट्र केसरीवरच लक्ष्य ठेवायचं, असं वडील म्हणत होते, असं त्याने सांगितलं. अभिजीतचा व्यायाम पहाटे 4 वाजता उठून 4 ते 6 सपाटे, दररोज 5 किमी रनिंग, आठवड्यातून 2 दिवस 10 किमी धावणे, मग कुस्तीचा सराव करतो. 9 ते साडे दहा एक दिवस कुस्तीची तांत्रिक प्रॅक्टिस, एक दिवस जिमचा व्यायाम. त्यानंतर मग बदामाची थंडाई, 10 अंडी, नाशत्याला पोहे, उपमा यापैकी एक, तुपातलं जेवण करायचं, त्यानंतर आराम करायचा. बारा ते तीन आराम करायचा, मग तीननंतर अडीच तास पुन्हा प्रॅक्टिस सुरु. दुपारचं जेवण शाकाहारी आणि रात्रीचं जेवण मांसाहारी असतं. मोसंबी ज्यूस, दोन्ही वेळेस दूध असा खुराक अभिजीत घेतो. गर्भश्रीमंत, तरीही संन्यासी अभिजीत कटके याची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे. मात्र तरीही तो तालमीत राहतो. तालमीत तो एखाद्या संन्यासाप्रमाणे राहतो. वर्षातून एक-दोनदाच घरी जातो. तालमीतच राहतो, तालमीतच झोपतो, तो खूप मेहनत करतो, असं अभिजीतचे वस्ताद अमर निंबाळकर यांनी सांगितलं. माझा कट्टावरील महत्त्वाचे मुद्दे लहानपणी कुस्ती आवडायची नाही, पप्पा कुस्तीला घेऊन जायचे, तिथे हरलं की खुन्नस निर्माण व्हायची, मग हळूहळू कुस्तीत रमत गेलो : अभिजीत कटके अभिजीतचा शारिरीक व्यायाम घेण्यापेक्षा मी त्याला मानसिकरित्या सक्षम करत होतो, त्याच्या तंत्रावर भर दिला : अभिजीत कटकेचे वस्ताद घरात सुखसुविधा असूनही अभिजीत तालमीत राहतो, तोही संन्यासासारखा : अभिजीत कटकेचे वस्ताद अभिजीत वर्षातून एक-दोनदाच घरी जातो, तालमीत राहतो, तालमीत झोपतो, त्याची मेहनत खूप आहे : अभिजीत कटकेचे वस्ताद गाडीवरुन फिरणाऱ्या पोरांकडे लक्ष द्यायचं नाही, मला महाराष्ट्र केसरीची गदा दे, मग काय करायचंय ते कर, असं पप्पा नेहमी सांगायचे : अभिजीत कटकेचे वस्ताद – सख्ख्या बहिणीच्या लग्नात मी दुपारी व्यायाम करुन गेलो, पप्पाही सोबतीलाच होते : अभिजीत कटके माती ही महाराष्ट्राची परंपरा, पण मॅटला व्यावसायिक रुप आल्याने त्यावर प्रॅक्टिस करतो : अभिजीत कटके चंद्रहार पाटील यांची 2007 मध्ये कुस्ती पाहिली होती, त्यांचा आदर्श माझ्यासमोर होता : अभिजीत कटके सुशीलकुमारची शिस्त मला आवडली, तो खूपच शिस्तीचा आहे : अभिजीत कटके किरण भगत हा मोठा पैलवान आहे, तो माझा दोस्तही आहे : अभिजीत कटके किरण नाराज असू शकत नाही, त्याने एकदा मला हरवलंय, मी एकदा त्याला हरवलंय : अभिजीत कटके
आणखी वाचा























