महाराष्ट्र केसरी जिंकला शिवराजनं पण चर्चा सिकंदरची; सोशल मीडियावरील चर्चेनंतर सिकंदरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
कुस्तीचा प्रवास इथंच थांबलेला नसून पुढील महाराष्ट्र केसरी जिंकून दाखवेल, असा विश्वास सिकंदर शेखने व्यक्त केला आहे. तो पिंपरी चिंचवडमध्ये आला होता, तेंव्हा त्याने पत्रकारांशी संवाद साधला.
Maharashtra Kesari 2023: महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेसोबत (Shivraj Rakshe) मल्ल सिकंदर शेखची (Sikandar shaikh) सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. सेमीफायनलमध्ये त्याच्यावर अन्याय झाल्याने चाहुबाजूने त्याच्या पाठीशी चाहते उभे ठाकले आहे. यावर स्वतः सिकंदरने भाष्य केलं आहे. महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार म्हणून सिकंदर शेखकडे ही अनेकांच्या नजरा होत्या. मात्र, सेमिफायनलमध्ये त्याच्यावर पंचांनी अन्याय केला, अशा आशयाची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. उपकेसरी महेंद्र गायकवाडकडून सिकंदरला पराभव स्वीकारावा लागला. पण या पराभवाचे शल्य असल्याचं सिकंदरने म्हटलं असून अन्याय झाल्याचं अप्रत्यक्षरीत्या म्हटलं आहे. मात्र कुस्तीचा प्रवास इथंच थांबलेला नसून पुढील महाराष्ट्र केसरी जिंकून दाखवेल, असा विश्वास ही त्याने व्यक्त केला आहे. तो पिंपरी चिंचवडमध्ये आला होता, तेंव्हा त्याने पत्रकारांशी संवाद साधला.
सिकंदर म्हणाला की, मी सोशल मीडियावरील सर्व प्रतिक्रिया पाहिल्या आहेत. मी या प्रेमाबद्दल सर्वांचा आभारी आहे. त्यांना वाटतंय की मी महाराष्ट्र केसरी व्हायला हवं होतं. अनेकांना धक्का बसला आहे. आज कुस्ती कळत नाही असं कुणी महाराष्ट्रात नाही, अन्याय झाला की नाही झाला याबद्दल तुम्ही सोशल मीडियावर पाहू शकता, असंही सिकंदर म्हणाला.
मी सर्वांना आवाहन करतो की आपलं प्रेम कायम असू द्या. तुम्ही माझ्यासाठी रडलात, मी आश्वासन देतो की नक्की महाराष्ट्र केसरी जिंकून दाखवेन, असंही सिकंदर म्हणाला. पुण्यामध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती विभागात महेंद्र गायकवाडनं सिकंदर शेखला पराभूत केलं. या लढतीत पंचांनी सिकंदरवर अन्याय केला असल्याची भावना सोशल मीडियातून व्यक्त केली जात आहे.
सिकंदर मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा. सिकंदरच्या घरात आजोबापासूंनचा कुस्तीचा वारसा आहे. वडील रशिद शेख पैलवानकी करायचे. सिंकदर वडीलांचे स्वप्न उराशी बाळगुन कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत कुस्तीचे धडे गिरवू लागला. सिंकदरने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, विद्यापीठस्तरीय स्पर्धा गाजवल्या. वयाच्या पंचवीसाव्या वर्षी अनेक अनुभवी मल्लांना चितपट केलं आहे. सिकंदर अलीकडेच भारतीय लष्करात भरती झाला आहे. तो सैन्यदलाकडून खेळतो.
महाराष्ट्र केसरीचा किताब नांदेडचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेडच्या शिवराज राक्षेनं जिंकला. त्याला मानाची गदा, महिंद्रा थार जीप आणि पाच लाखांचं बक्षीस मिळालं आहे. तर उपविजेता महेंद्र गायकवाड ट्रॅक्टर आणि अडीच लाख रुपयांचा मानकरी ठरला आहे.
ही बातमी देखील वाचा