India-Pakistan : भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, ठिकाण ठरलं
India-Pakistan Match : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना क्रीडा प्रेमींसाठी मेजवानी असते. विश्वचषकातील पराभवाची परतफेड करण्याची संधी भारताला आली आहे.
India-Pakistan Match : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना क्रीडा प्रेमींसाठी मेजवानी असते. टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा पराभव करत पाकिस्तान संघानं इतिहास रचलाय. याच पराभवाची परतफेड करण्याची संधी भारताला आली आहे. पण क्रिकेटच्या मैदानावर नव्हे तर कब्बडीच्या मैदानावर. पुढील वर्षी भारत आणि पाकिस्तान संघामध्ये (India vs Pakistan) कबड्डीचा सामना होणार आहे. दोन्ही देशाकडून याला दुजोरा दिला आहे. बातचीत अंतिम टप्यात आहे. पुढील वर्षी चार देशांच्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेपूर्वी (International Kabaddi Tournament) करतारपूर कॉरिडोरमध्ये (Kartarpur Corridor) मार्च 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) कबड्डीचा सामना रंगणार आहे. याबाबत पाकिस्तानकडून स्टेसमेंट जारी करण्यात आलं आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये कबड्डीच्या मैदानावर आता लढत होणार आहे. याबाबत पाकिस्तान कबड्डी फेडरेशनचे (PKF) सचिव राणा मोहम्मद सरवर (Rana Mohammad Sarwar) यांनी दुजोरा दिलाय. शनिवारी ते म्हणाले की, ‘भारत आणि पाकिस्तान मार्च 2022 मध्ये करतारपूर कॉरिडोरमध्ये एक आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी तयार आहेत.’ मोहम्मद सरवर (Mohammad Sarwar) पुढे म्हणाले की, ' आपण ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी तयार आहोत. कारण, पाकिस्तान आणि भारताने करतारपूर कॉरिडोरमध्ये एका आंतरराष्ट्रीय सामन्याला परवानगी दिली आहे. दोन्ही देशांनी यावर सहमती दर्शवली आहे. दोन्ही संघ सामना खेळण्यासाठी सिमेवर येणार आहेत. सामन्यानंतर दोन्ही संघ आपापल्या देशात परतणार आहेत.'
सामन्याबद्दल अधिक माहिती विचारली असता मोहम्मद सरवर म्हणाले की, अखेरच्या काही मुद्द्यांवर चर्चा सुरु आहे. अशी आशा ही की मार्च 2022 पर्यंत दोन्ही देशांमध्ये आंतरराष्ट्रीय सामना होईल. कारण आम्ही एप्रिलमध्ये चार देशांच्या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. त्यापूर्वी एक आठवडा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कबड्डीचा रोमांच पाहायला मिळेल. दोन्ही देश याबाबत सकारात्मक आहेत.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान कबड्डीचे संघ फेब्रुवारी 2020 मध्ये कबड्डी विश्वचषकात समोरासमोर आले होते. पाकिस्तान संघानं 43-41 च्या फरकानं भारताचा पराभव करत कबड्डी विश्वचषकावर नाव कोरलं होतं. या पराभवाचा वचपा काढण्याची संधी भारतीय कबड्डी संघाला आली आहे. मार्च 2022 मध्ये पाकिस्तान आणि भारताचे संघ भिडणार आहेत.