Women’s Premier League Women’s IPL : पुरुष आयपीएलच्या धर्तीवर होणाऱ्या महिला इंडियन प्रीमियर लीगचं नाव वुमन्स प्रीमियर लीग असं करण्यात आले आहे. बीसीसीआय अध्यक्ष जय शाह यांनी याबाबतची माहिती दिली. त्याशिवाय महिला इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेत पाच संघ असतील, हेही स्पष्ट झाले. यामध्ये अहमदाबाद, मुंबई, बेंगलोर, दिल्ली आणि लखनौ या पाच संघाचा समावेश असेल. या संघाचा आज लिलाव झाला. यासाठी अनेक मोठ्या कंपन्यांनाही रस दाखवला होता. बीसीसीआयनं ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. अदानी ग्रुपने अहमदाबादचा संघ खरेदी केला आहे तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने बेंगलोरच्या संघ विकत घेतला आहे. या संघासाठी त्यांनी मोठी रक्कम मोजली आहे.
कुणी किती रुपयाला खरेदी केला संघ ? -
वुमन्स प्रीमियर लीगमधील पाच संघाचा आज लिलाव झाला. अहमदाबाद संघाला सर्वाधिक बोली लागली होती. अदानी स्पोर्ट्स लाइन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अहमदाबाद संघाला 1289 कोटी रुपयांत खरेदी केलं. इंडिया विन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने मुंबई संघाला 912.99 कोटी रुपयांत खरेदी केलं. महिला आयपीएलमधील तिसऱ्या संघाला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघानं खरेदी केलंय. आरसीबीनं बेंगलोरसाठी 901 कोटी रुपये मोजलेत.. तर दिल्लीच्या संघाला जेएसडब्ल्यू जीएमआर क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 810 कोटी रुपयांत खरेदी केलं. कापरी ग्लोबल होल्डिंग्स यांनी लखनौच्या महिला संघासाठी 757 कोटी रुपये मोजले आहेत. वुमन्स प्रीमियर लीगमधील पाचही संघाची एकूण किंमत 4669.99 कोटी रुपये इतकी झाली आहे.
याच वर्षी पहिला हंगाम -
पुरुष आयपीएलच्या धर्तीवर बीसीसीआयने महिला आयपीएलची सुरुवात केली आहे. वुमन्स प्रीमियर लीग याच वर्षी मार्च या महिन्यात सुरु होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चार मार्च ते 26 मार्च या कालावधीत वुमन्स प्रीमियर लीग ही स्पर्धा होणार आहे.
खेळाडूंचा लिलाव कधी ?
मार्च महिन्यात पाच संघात होणाऱ्या वुमन्स प्रीमियर लीग या स्पर्धेत 22 सामने होण्याची शक्यता आहे. यासाठी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियन आणि डीवाय पाटील स्टेडियमची निवड करण्यात आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, फेब्रुवारीमध्ये खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे. वायकॉन18 ने या स्पर्धेचे मीडिया राइट्स खरेदी केले आहेत.
आणखी वाचा :
Mohammed Siraj : मोहम्मद सिराज सुसाट, एकदिवसीय क्रमवारीत पटकावलं अव्वल स्थान
ICC Rankings : किवींना व्हाईट वॉश अन् टीम इंडिया पहिल्या स्थानावर