ICC Men's ODI Bowler Ranking : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)  याने गेल्या काही दिवसांत धारधार गोलंदाजी केली आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराजने टीम इंडियासाठी गोलंदाजीची धुरा सांभाळली होती. वर्षभरात सिराज याने अनेक प्रतिस्पर्धी फलंदाजांना चीतपट केले. याचेच फळ सिराजला मिळालं आहे. आयसीसीनं नुकतीच एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. गोलंदाजीत मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)  यानं अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. गेल्या वर्षभरात एकदिवसीय सामन्यात मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याने गोलंदाजीत  दर्जेदार कामगिरी केली. 


2019 मध्ये एकदिवसीय सामन्यात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराज यानं अवघ्या तीन वर्षांत अव्वल स्थान पटकावले आहे. फेब्रुवारी 2022 पासून सिराज एकदिवसीय संघाचा नियमित सदस्य आहे. अचूक टप्प्यावर मारा, हे सिराजच्या गोलंदाजीचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंडविरोधात मायदेशात झालेल्या मालिकेत सिराज यानं भेदक गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी फलंदाजांना बाद केले. सिराजच्या गोलंदाजीपुढे फलंदाज अडखळत होते...  


वर्षभरात कशी झाली कामगिरी ?


मागील वर्षभरात मोहम्मद सिराज याने 20 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 37 विकेट घेतल्या आहेत. त्याशिवाय त्याने तिखट मारा केल्याने त्याचा सामना करणे फलंदाजांसाठी आव्हानात्मक ठरले होते. सिराजने प्रति षटक फक्त पाच धावा लुटल्या आहेत. श्रीलंका आणि न्यूझीलंडविरोधात सिराजने आग ओकणारी गोलंदाजी केली. श्रीलंकाविरोधात सिराजला मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आले होते. तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत सिराजने 9 विकेट घेत आयसीसी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली होती. आता न्यूझीलंडविरोधात झालेल्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातही सिराजनं अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली होती. या कामगिरीच्या बळावर सिराजनं न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट आणि ऑस्ट्रेलियाच्या जोश हेसलवूड यांना मागे टाकत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. 


वन डे मध्ये टॉप 10 गोलंदाज कोण?


729 गुणांसह मोहम्मद सिराज अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या जोश हेलवुडचे 727 गुण आहेत. तर ट्रेंट बोल्ड 708 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मिचेल स्टार्क (665) आणि राशिद खान (659) टॉप-5 मध्ये आहेत. एडम जम्पा, शाकिब अल हसन, शाहीन आफ्रिदी, मुस्ताफिजुर रहमान आणि मूजीब उर रहमान अनुक्रमे टॉप मध्ये आहेत. कुलदीप यादव टॉप 20 मध्ये असणारा दुसरा गोलंदाज आहे. 


वन-डे मध्ये भारत अव्वल 


न्यूझीलंडविरोधात मायदेशात झालेल्या एकदिवसीय मालिकेपूर्वी टीम इंडिया क्रमवारीत चौथ्या स्थानावर होती. तर न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावर होते. पण भारताने 3-0 च्या फराकाने धूळ चारल्यामुळे न्यूझीलंडची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. तर भारतीय संघ पहिल्या स्थानावर पोहचलाय. भारत, इंग्लंड,ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज हे संघ एकदिवसीय क्रमवारीत आघाडीवर आहेत. 


आणखी वाचा :
ICC Rankings : किवींना व्हाईट वॉश अन् टीम इंडिया पहिल्या स्थानावर