MS Dhoni : थालाच्या डोळ्यासमोर चेपॉकचा बालेकिल्ला ढासळला; कोलकाताविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी काय म्हणाला?
बऱ्याच वर्षांनी बंगळुरू आणि दिल्लीविरुद्ध घरच्या मैदानावर झालेला पराभव पुरेसा नव्हता, त्यात आता कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धने चेन्नई सुपर किंग्जच्या किल्ल्याच्या बुरूजाला मोठ्या भेगा पडल्या आहेत.

बऱ्याच वर्षांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध घरच्या मैदानावर झालेला पराभव पुरेसा नव्हता, त्यात आता कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धने चेन्नई सुपर किंग्जच्या किल्ल्याच्या बुरूजाला मोठ्या भेगा पडल्या आहेत. गेल्या 17 वर्षांपासून विरोधी संघांसाठी सापळा ठरलेला चेन्नई सुपर किंग्जचा चेपॉकचा बालेकिल्ला अठराव्या हंगामात पूर्णपणे ढासळला आहे. आयपीएल 2025 मधील खराब सुरुवातीतून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चेन्नईला सलग पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हे सर्व आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि चेन्नईची सर्वात मोठी ओळख असलेल्या एमएस धोनीच्या डोळ्यासमोर घडले.
पराभवानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी काय म्हणाला?
एमएस धोनी म्हणाला की,"काही सामन्याचे निकाल आमच्या बाजूने गेले नाहीत. त्यामुळे आम्हाला आता आत्मपरीक्षण करावे लागेल. खरंतर, आज आम्ही पुरेसे धावा करू शकलो नाही. चेंडू थोडा थांबून येत होता, असे यापूर्वीही झाले आहे. आणि दुसऱ्या डावातही असे झाले. दर्जेदार फिरकी गोलंदाजांसमोर खेळणे कठीण होते. परिस्थिती पाहणे महत्त्वाचे आहे. आम्हाला भागीदारीही करता आल्या नाहीत. दुसऱ्या कोणाशी किंवा दुसऱ्या संघाशी तुलना करायची नाही. आमच्याकडे दर्जेदार सलामीवीर आहेत आणि स्कोअरबोर्ड पाहून हताश होऊ नये हे महत्त्वाचे आहे.लवकर विकेट्स गमावल्या तर मधल्या फळीला जास्त मेहनत करावी लागते.
Game set and done in a thumping style ✅@KKRiders with a 𝙆𝙣𝙞𝙜𝙝𝙩 to remember as they secure a comprehensive 8️⃣-wicket victory 💜
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2025
Scorecard ▶ https://t.co/gPLIYGiUFV#TATAIPL | #CSKvKKR pic.twitter.com/dADGcgITPW
केकेआर 8 विकेट्सनी जिंकला...
शुक्रवार 11 एप्रिल रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर जे चाहत्यांमध्ये चेपॉक म्हणून प्रसिद्ध आहे, यजमान सुपर किंग्जला कोलकाता नाईट रायडर्सकडून दारुण पराभव पत्करावा लागला. चेपॉकच्या आयपीएलच्या इतिहासात चेन्नईसाठी हा सामना सर्वात वाईट ठरला, जिथे संघ फक्त 103 धावा करू शकला आणि नंतर 8 विकेटने पराभूत झाला. हे सर्व त्या सामन्यात घडले ज्यामध्ये धोनी 683 दिवसांनी सीएसकेचा कर्णधार म्हणून परतला.
सीएसकेच्या नावावर लज्जास्पद विक्रम
यासोबतच, सीएसकेच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम जोडला गेला. आजच्या आधी, आयपीएलच्या 17 वर्षांच्या इतिहासात चेन्नईने कधीही सलग 5 सामने हरली नव्हती. चेन्नईला सलग 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर या हंगामात चेन्नईचा त्यांच्या घरच्या मैदानावरचा हा तिसरा पराभव होता. चेन्नई संघाने घरच्या मैदानावर सलग तीन सामने गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. या हंगामात, सीएसकेला आरसीबी, दिल्ली आणि आता चेपॉक येथे कोलकाताकडून पराभव पत्करावा लागला आहे.





















