IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सने निवडला कर्णधार, पंतच्या जागी हा खेळाडू करणार नेतृत्व
IPL 2023 : दुखापतीमुळे ऋषभ पंत यंदाच्या आयपीएल स्पर्धेला मुकणार आहे. हा दिल्लीसाठी मोठा धक्का मानला जातोय.
IPL 2023 : दुखापतीमुळे ऋषभ पंत यंदाच्या आयपीएल स्पर्धेला मुकणार आहे. हा दिल्लीसाठी मोठा धक्का मानला जातोय. ऋषभ पंतच्या जागी दिल्ली कॅपिटल्सने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर याच्याकडे दिल्ली संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. दिल्ली संघाने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. 2022 वर्षाच्या अखेरीस एका कार अपघातात ऋषभ पंत जखमी झाला होता, यातून तो अद्याप सावरलेला नाही. पंतच्या अनुपस्थितीचा दिल्लीला मोठा फटका बसणार आहे.
वॉर्नर दुसऱ्यांदा करणार नेतृत्व -
डेविड वॉर्नर आयपीएलच्या करिअरमध्ये दुसऱ्यांदा दिल्ली संघाचे नेतृत्व करत आहे. 2009 ते 2013 यादरम्यान वॉर्नर दिल्ली संघाचा सदस्य होता. अखेरच्या काही सामन्यात वॉर्नरने दिल्ली संघाचे नेतृत्व सांभाळले होते. त्यानंतर तो सनरायजर्स हैदराबाद संघाचा कर्णधारही राहिलाय. SRH ने 2014 मध्ये वॉर्नरला खरेदी केले होते. त्यानंतर पुढील हंगामात वॉर्नरकडे नेतृत्व सोपवलं होतं. 2016 मध्ये वॉर्नरने एकट्याच्या जिवावर हैदराबादला अंतिम सामन्यापर्यंत नेहले होते. आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारामध्ये (जिंकलेले सामने) वॉर्नर संयुक्तरित्या पाचव्या स्थानावर आहे. वॉर्नरने आयपीएलमध्ये 69 सामन्यात नेतृत्व केलेय, यामधील 35 सामन्यात विजय तर 32 सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता. दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. ऋषभ पंतच्या अनुपस्थित आता डेविड वॉर्नर दिल्लीच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. वॉर्नरच्या नेतृत्वात दिल्लीचा संघ कशी कामगिरी करतो? याकडे आयपीएल प्रेमींचं लक्ष लागलेय.
POV: Imagining Captain Davey arriving at #QilaKotla via the nearest #DelhiMetro 🐯🚇
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 16, 2023
Dilli, it's time to roar together this #IPL2023 with David Warner (𝗖) ❤💙#YehHaiNayiDilli | @davidwarner31 pic.twitter.com/xzEoWhKyyR
6.25 कोटींमध्ये केले होते खरेदी -
2022 मध्ये झालेल्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने डेविड वॉर्नर याला 6.25 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. 2021 मध्ये खराब कामगिरीमुळे हैदराबाद संघाने वॉर्नरला रिलीज केले होते. पण दिल्लीने वॉर्नरवर डाव खेळला. वॉर्नरे 47.33 च्या सरासरीने 2840 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 142 इतका राहिलाय. वॉर्नरने एका शतकांसह 26 अर्धशतकांचा पाऊस पाडला आहे.
गेल्या हंगामात कशी होती कामगिरी ?
गेल्या हंगामात डेविड वॉर्नर याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला होता. दिल्लीसाठी सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात वॉर्नर पहिल्या स्थानावर होता. वॉर्नरने 48 च्या सरासरीने आणि 150 च्या स्ट्राईक रेटने 432 धावा चोपल्या होत्या. लीग सामन्यात मुंबईकडून पराभव झाल्यामुळे दिल्लीचं आव्हान संपुष्टात आले होते. दरम्यान, वॉर्नर सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेत व्यस्त आहे. 17 मार्चपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे.