GT vs PBKS : आयपीएलमध्ये मोठा उलटफेर, पंजाबकडून गुजरातला पराभवाचा धक्का, होमग्राऊंडवर विजयाचं स्वप्न भंगलं
GT vs PBKS : पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 17 वी मॅच पार पडली. अखेरच्या ओव्हरपर्यंत ही मॅच रंगली.
अहमदाबाद : आयपीएलमध्ये (IPL 2024) पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात 17 वी मॅच पार पडली. पंजाबचा कॅप्टन शिखर धवननं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला होता. गुजरातनं पहिल्यांदा फलदाजी करताना 4 विकेटवर 199 धावा केल्या होत्या. गुजरातकडून कॅप्टन शुभमन गिलनं 89 धावा केल्या. गुजरातनं दिलेल्या धावांचं आव्हान पार करताना पंजाबच्या संघानं 3 विकेटनं विजय मिळवला.
पंजाब किंग्जच्या डावाची सुरुवात खराब झाली. कर्णधार शिखर धवनला गुजरातच्या उमेश यादवनं केवळ एका रन वर बाद केलं. यानंतर जॉनी बेयरस्टो आणि प्रभासिमरन सिंगनं पंजाबचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. जॉनी बेयरस्टोनं 22 धावा केल्यानंतर त्याला नूर अहमदनं बाद केलं. प्रभा सिमरननं देखील पंजाबचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यानं 35 धावा केल्या. सॅम करन चांगली करु शकला नाही. तो केवळ 5 धावा करुन बाद झाला. सिकंदर रझाला आज संघात संधी देण्यात आली होती, त्यानं 15 धावा केल्या. शशांक सिंगनं जितेश शर्माच्या साथीनं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. जितेश शर्मानं 16 धावा केल्या. शशांक सिंगनं पंजाबसाठी महत्त्वाची खेळी करत पंजाबचं आव्हान कायम ठेवलं. शशांक सिंगनं अर्धशतकी खेळी करुन डाव सावरला. तर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या आशुतोषनं फटकेबाजी केली. शशांक सिंगनं 61 धावा केल्या.
शुभमन गिलच्या नेतृत्त्वातील गुजरात टायटन्सनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 20 ओव्हर्समध्ये 4 विकेटवर 199 धावा केल्या होत्या. शुभमन गिलनं सुरुवातीपासून शेवटच्या ओव्हरपर्यंत मैदानावर एकहाती किल्ला लढवत गुजरातसाठी 89 धावा केल्या. शुभमन गिल एकहाती किल्ला लढवत असताना त्याला संघातील दुसऱ्या खेळाडूंची म्हणावी तशी साथ मिळाली नाही. अन्यथा गुजरातनं 200 धावांचा टप्पा पार केला असता.
गुजरात टायटन्सकडून रिद्धिमान साहानं 11 धावा केल्या. केन विलियमन्सनं 26 धावा केल्या. साई सुदर्शननं शुभमन गिलला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो 33 धावा करुन बाद झाला. तर, राहुल तेवतियानं 23 धावा केल्या.