(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023 मध्ये रोहित शर्माला आराम दिला जाणार ? कोच मार्क बाऊचरने दिली हिंट
Mumbai Indian : सर्वात मोठ्या क्रिकेट महोत्सवाची सुरुवात होण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये पहिला सामना रंगणार आहे.
Mumbai Indian IPL 2023 : सर्वात मोठ्या क्रिकेट महोत्सवाची सुरुवात होण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये पहिला सामना रंगणार आहे. तर दोन एप्रिल रोजी मुंबईचा संघ आरसीबीसोबत दोन हात करणार आहे. मुंबईचा संघ गतवर्षीपेक्षा चांगली कामगिरी करण्यास सज्ज झाला आहे. गेल्यावर्षी मुंबईची अवस्था अतिशय खराब झाली होती. मुंबईचा संघ दहाव्या क्रमांकावर होता. मार्क बाऊचर यंदा मुंबई संघाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. त्याचा हा मुंबईसोबतचा पहिलाच हंगाम असेल. आयपीएलच्या रनसंग्रामाला सुरुवात होण्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा आणि मार्क बाऊचर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बाऊचरने रोहित शर्माला काही सामन्यात आराम देण्यात येणार असल्याची हिंट दिली... प्रसार माध्यमांशी बोलताना बाऊचर म्हणाला की, रोहित शर्माला आराम देण्यात कोणताही समस्या नाही.
रोहितला आराम दिला जाणार?
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विश्वचषकाचा थरार रंगणार आहे, यामध्ये रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. रोहित शर्माचा वर्कलोड पाहता त्याला आयपीएलमधील काही सामन्यात आराम मिळण्याची शक्यता आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया कप आणि विश्वचषक अशा मोठ्या स्पर्धा पुढील सहा ते सात महिन्यात रंगणार आहेत. त्यामुळे रोहितला आराम मिळण्याची शक्यता आहे. बुधवारी पत्रकार परिषदेत रोहित शर्माला याबाबत विचारले असता त्याने हा प्रश्न बाऊचरकडे सोपवला. बाऊचर म्हणाला की,
‘रोहित शर्मा मुंबईचा कर्णधार आहे, तो आयपीएलमध्ये चांगल्या लयीत असेल यात शंकाच नाही. रोहित शर्माला क्रिकेटपासून आराम नको असेल, पण परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. रोहित शर्माला आराम देण्यात कोणतीही समस्या नाही.’
रोहित शर्माला आयपीएल 2022 मध्ये फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. रोहित शर्माला एकही अर्धशतक झळकावता आले नव्हते. 19 च्या सर्वसामान्य सरासरीने त्याने 268 धावा केल्या होत्या. याबाबत बोलताना बाऊचर म्हणाला की, कर्णधार आणि खेळाडू म्हणून रोहित शर्माकडून सर्वश्रेष्ठ कामगिरी करुन घेता आली तर खूपच चांगले आहे. त्यादरम्यान त्याला एक दोन सामन्यात आराम देण्याची वेळ आली तर देऊयात.. यात कोणतीही अडचण नाही.'
नव्या नियमांवर काय म्हणाला बाऊचर?
नवीन नियम हे गेमचेंजर ठरतील असे मानले जाते. रोहित शर्मा आणि बाऊचर यांनी आपली मते व्यक्त केली. बाऊचर म्हणाला की, “बदललेले नियम चांगले आणि नावीन्यपूर्ण आहेत. आता ते प्रत्यक्षात अंमलात येतील तेव्हा त्याबद्दल बरेच काही शिकायला मिळेल. सामने जसजसे पुढे जातील तसतसे आम्ही आमच्या निर्णयांमधून आणि दुसऱ्या टीमच्या निर्णयातून शिकत जाऊ. भारतासारख्या देशात जिथे दंव खूप महत्त्वाची भूमिका बजावते तिथे टॉस जिंकल्यानंतर खेळणाऱ्या 11 च्या संघ निवडीचे महत्त्व मोठे असेल.”
बाऊचरबद्दल काय म्हणाल रोहित शर्मा ?
बाऊचरचा हा मुंबईचा मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिला सीझन असेल. त्याने आपल्या मनात एक ध्येय ठरवून आपल्या कामाची जोरदार सुरूवात केली आहे. “सुरूवात तर चांगली झालीय आणि आंतरराष्ट्रीय टीम्सना प्रशिक्षण देणे ही एक खूप वेगळी गोष्ट आहे. एमआय अत्यंत प्रोफेशनल आहे आणि ते खूप बारीक सारीक गोष्टींवर लक्ष देतात. ही गोष्ट खरोखर खूप खास आहे आणि आमचा सपोर्ट स्टाफदेखील खूप चांगला आहे,”
आणखी वाचा :
इम्पॅक्ट प्लेअरचा इम्पॅक्ट पडणार, यंदाच्या आयपीएलमध्ये नवे नियम, जाणून घ्या सविस्तर
IPL 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करणं सोपं नाही; पाहा ताकद आणि कमजोरी