IPL 2022, Suresh Raina : आयपीएलच्या पंधराव्या सीझनसाठी बंगळुरुमध्ये लिलाव पार पडला. लिलावात सर्व संघांनी अनेक खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी कोट्यवधींची बोली लावत आपली तिजोरी रिकामी केली. अनेक अष्टपैलू खेळाडूंवर या लिलावात पैशांचा पाऊस पडला. पण 'मिस्टर आयपीएल' म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना (Suresh Raina) मात्र या लिलावात अनसोल्ड राहिला. एकेकाळी चेन्नईच्या संघाची भिस्त असणाऱ्या रैनावर चेन्नईने साधी बोलीही लावली नाही. यंदाच्या लिलावात सुरेश रैनाचा अनुभव आणि त्याची गुणवत्ता याकडे चेन्नई सुपर किंग्ससह दहाही फ्रँचाईझींनी पाठ फिरवली. यंदाच्या आयपीएल लिलावात रैनावर एकाही फ्रँचाईझीनं बोली लावली नाही. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या फलंदाजाच्या शर्यतीत रैना चौथ्या स्थानावर आहे. पण यंदा तो आयपीएलमध्ये तो खेळताना दिसणार नाही. 


सुरेश रैनाला खरेदी न केल्यामुळं नेटकरी सीएसके विरोधात सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी रैनावर बोली न लावण्याबाबत मौन सोडलं आहे. बंगळुरुमध्ये झालेल्या लिलावाच्या पहिल्या दिवशी सुरेश रैना अनसोल्ड राहिला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी तरी त्याच्यावर बोली लावली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु, दुसऱ्या दिवशीही सीएसकेसह इतर संघांनीही त्याच्याकडे पाठ फिरवली. याबाबत बोलतावा विश्वनाथ म्हणाले की, "हे खरंय की, सीएसकेसाठी सुरेश रैना सातत्यानं चांगली कामगिरी केली आहे. तरी संघ बनवताना खेळाडूंचा फॉर्म आणि संघाची रचना लक्षात ठेवली जाते."


पाहा व्हिडीओ : सुरेश रैनावर का नाही लावली बोली? CSK च्या सीईओंचं स्पष्टीकरण 



सीएसकेच्या अधिकृत युट्यूब अकाउंटवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये सीईओ काशी विश्वनाथ म्हणाले की, "सुरेश रैना गेल्या 12 वर्षांपासून सीएसके (CSK) साठी उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. अर्थातच, रैनाची अनुपस्थिती आमच्यासाठी खूप कठीण होती. परंतु, तुम्हाला हे समजले पाहिजे की, संघाची रचना संघाच्या फॉर्म आणि प्रकारावर अवलंबून असते, जो प्रत्येक संघाचा निर्णय असतो. त्यामुळे रैना या संघासाठी फिट नाही, असं आम्हाला वाटलं." 


लिलावाच्या पहिल्या दिवशी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने घेतलेल्या फाफ डू प्लेसिससाठीही सीएसकेने बोली लावली नाही. विश्वनाथ म्हणाले, 'गेल्या दशकापासून जे आमच्यासोबत होते, त्यांना आम्ही मिस करू. हीच लिलावाची प्रक्रिया आणि गतिशीलता आहे."


दरम्यान, आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये सुरेश रैना चौथ्या क्रमांकावर आहे. रैनाने 205 आयपीएल सामन्यांमध्ये 5,528 धावा केल्या आहेत. त्याच्या पुढे फक्त विराट कोहली, शिखर धवन आणि रोहित शर्मा आहेत. यापैकी रैनाने चेन्नई फ्रँचायझीसाठी 4687 धावा केल्या आहेत. तो चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 




दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा