IPL 2022, Mega Auction : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चा मेगा लिलाव संपला आहे. बंगळुरूमध्ये झालेल्या या दोन दिवसीय लिलावात खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. ईशान किशन, श्रेयस अय्यर, दीपक चहर हे भारतीय स्टार्स दिसले. त्याचवेळी लियाम लिव्हिंगस्टोन, वानिंदू हसरंगा या परदेशी स्टार्सनी लिलावात वर्चस्व गाजवलं. अशातच लिलाव संपल्यानंतर चाहत्यांमध्ये यंदाच्या सीझनबाबत उत्सुकता दिसून येत आहे. 


600 खेळाडूंवर लागली बोली, 204 विक्री


आयपीएल 2022 च्या लिलावात 600 खेळाडूंची यादी करण्यात आली होती. यामध्ये 228 कॅप्ड आणि 365 अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश होता. याशिवाय सहयोगी देशांतील 7 खेळाडूंचाही सहभाग होता. लिलावात 377 भारतीय आणि 223 परदेशी खेळाडूंवर बोली लावली जाणार होती. मात्र मेगा लिलावात 67 परदेशी खेळाडूंसह केवळ 204 खेळाडूंचीच विक्री झाली. पहिल्या दिवशीच्या लिलावात 74 खेळाडूंना खरेदी करण्यात आलं, तर दुसऱ्या दिवशी 104 खेळाडूंवर पैशांचा वर्षाव करण्यात आला. 


551 कोटींहून अधिक खर्च, लखनौकडून सर्वाधिक पैसा खर्च 


आयपीएलच्या संपूर्ण लिलाव प्रक्रियेत एकूण 5 अब्ज, 51 कोटी आणि 70 लाख रुपये खर्च झाले. यादरम्यान लखनौ सुपर जायंट्सने 21 खेळाडूंसाठी संपूर्ण 90 कोटी रुपये खर्च केले. विशेष म्हणजे, लखनौ फ्रँचायझीने बाकीच्या संघांच्या तुलनेत कमी खेळाडूंना खरेदी केलं. लखनौ सुपर जायंट्सनं केएल राहुलची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. याशिवाय राहुल व्यतिरिक्त फ्रँचायझीनं मार्कस स्टॉयनिस आणि रवी बाश्नोई यांनाही लिलावापूर्वी साइन केलं होतं.


ईशान किशान सर्वात महागडा खेळाडू 


IPL 2022 च्या लिलावात ईशान किशन हा सर्वात महागडा विकणारा खेळाडू होता. यष्टिरक्षक, फलंदाज असलेला ईशान किशनला मुंबई इंडियन्सने (MI) 15.25 कोटी रुपयांना विकत घेतलं. यासह, ईशान किशन हा आयपीएल लिलावात दुसरा सर्वात महाग विकला जाणारा भारतीय खेळाडू बनला आहे. युवराज सिंह हा लिलावात विकला जाणारा सर्वात महागडा भारतीय खेळाडू आहे. 2016 च्या लिलावात युवराजला दिल्ली डेअरडेव्हिल्सने 16 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. IPL 2022 च्या लिलावात दीपक चहर हा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) दीपक चहरला 14 कोटींना खरेदी केलं. 


'मिस्टर आयपीएल' सुरेश रैना अनसोल्ड 


आयपीएल लिलावात काही बड्या खेळाडूंची निराशा झाली. 'मिस्टर आयपीएल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुरेश रैनाचंही या खेळाडूंमध्ये नाव होतं. त्याचा आधीचा संघ चेन्नई सुपर किंग्जनंही रैनाला दोन कोटी रुपयांच्या मूळ किमतीनं खरेदी करण्यात रस दाखवला नाही. विशेष म्हणजे, आयपीएलच्या इतिहासात रैना सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. रैनानं 205 आयपीएल सामन्यांमध्ये 5,528 धावा केल्या आहेत. त्यांच्या पुढे फक्त विराट कोहली, शिखर धवन आणि रोहित शर्मा आहेत. रैना व्यतिरिक्त इयॉन मॉर्गन, अॅरॉन फिंच, स्टीव्ह स्मिथ हे खेळाडूही लिलावात विकले गेले नाहीत. 


लिलावाचे सुत्रसंचालक ह्यूजची तब्येत बिघडली, चारूनं सांभाळली 


लिलावाच्या पहिल्या दिवशी एक अप्रिय घटना घडली, जेव्हा लिलावाचे सुत्रसंचालक ह्यू अॅडम्स रक्तदाब कमी झाल्यामुळे स्टेजवरून खाली पडले. घटना घडली तेव्हा वनिंदू हसरंगाची बोली सुरू होती. अॅडम्सला तात्काळ उपचारासाठी नेण्यात आलं आणि लिलाव काही काळ स्थगित ठेवावा लागला. लिलाव पुन्हा सुरू झाला तेव्हा चारू शर्मानं लिलावकर्त्यांची भूमिका केली होती. चारू शर्मा, टीव्ही प्रेझेंटर आणि मशाल स्पोर्ट्सचे सह-संस्थापक, अगदी कमी सूचनेवर लिलावासाठी तयार होते. चारू शर्मा यांनी जबाबदारी चोख पार पाडली आणि त्यांनी अॅडमिनची कमतरता भासू दिली नाही.


केएल राहुलला सर्वाधिक पगार 


लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक मानधन घेणारा क्रिकेटपटू असेल. राहुलला लखनौ फ्रँचायझीने 17 कोटी रुपयांना करारबद्ध केलं होतं. या यादीत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत आणि चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू रवींद्र जाडेजा दुसऱ्या स्थानावर आहे. या तिन्ही खेळाडूंना त्यांच्या संघानं 16-16 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवलं होतं. या यादीत मुंबई इंडियन्सचा युवा फलंदाज ईशान किशन (15.25 कोटी) तिसऱ्या क्रमांकावर आहे.


यंदा आयपीएलमध्ये दहा संघ


आयपीएल लिलावानंतर, खेळाडू, चाहते आणि संघ स्पर्धा सुरू होण्याची वाट पाहत आहेत. आयपीएल 2022 चे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही, परंतु ते मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. या मोसमात 10 संघांमध्ये एकूण 74 सामने खेळवण्यात येणार आहेत. जे कदाचित मे अखेरपर्यंत चालतील.


आयपीएलच्या संघ मालकांनी इच्छा व्यक्त केली आहे की, यंदाच्या आयपीएलचं आयोजन भारतातच करण्यात यावं. बीसीसीआयही आयपीएल 2022 चं आयोजन भारतात करण्यासाठी उत्सुक आहे. परंतु, कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता, भारतीय क्रिकेट बोर्ड प्लान बीचाही विचार करत आहे. प्लॅन-बीनुसार, बीसीसीआय दक्षिण आफ्रिका किंवा यूएईमध्येही आयपीएलचं आयोजन करू शकते.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 




दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा