Gujrat Titans Team Profile : क्रिकेटचा महासंग्राम अर्थात आयपीएल 2022 ला काही दिवसांत सुरुवात होत आहे. यंदा 8 जागी 10 संघ असणार असल्याने स्पर्धा आणखी चुरशीची होणार हे नक्की. नव्याने वाढलेल्या संघातील एक संघ म्हणजे गुजरात टायटन्स. सीवीसी कॅपिटल्सने तब्बल 5 हजार 625 कोटी रुपये देऊन विकत घेतलेल्या या संघाची धुरा भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याकडे असणार आहे. हार्दीकसह राशिद आणि शुभमन हे स्टार खेळाडू संघात आधीपासून असून महालिलावात गुजरातने आणखी महारथी संघात घेतले आहेत. 


बोलिंग आहे ताकदवर बाजू 


गुजरात टायटन्स संघाचा विचार करता त्यांच्याकडे असणारा बोलिगं अटॅक त्यांची सर्वात जमेची बाजू आहे. कारण संघात जगातील अव्वल दर्जाचा फिरकीपटू राशिद खान आहे. सोबत वेगवान गोलंदाजीसाठी लॉकी फर्ग्यूसन आणि मोहम्मद शमी सारखे दिग्गज आहेत. नवखा पण उत्तम असा अल्झारी जोसेफही गुजरातमध्ये असून अनुभवी जयंत यादव आणि आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असणारा राहुल तेवतिया संघात आहे. 


मधली फळीही आहे मजबूत


गोलंदाजीनंतर फलंदाजीचा विचार करता संघात मधली फळी मजबूत आहे. कारण संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या जर चांगल्या फॉर्ममध्ये असेल तर त्याच्यासारखा अव्वल फिनीशर तोच. हार्दीकला सोबत देण्यासाठी अनुभवी रिद्धीमान साहा आहे. यासह युवा भारतीय विजय शंकर, राहुल तेवतिया यांचाही संघाला मधल्या फळीत फायदा होऊ शकतो. 


सलामी फलंदाजांचा प्रश्न कायम


संघात सलामीवीरांचा प्रश्न काहीसा कठीण आहे. कारण नुकताच जेसन रॉय याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे एकट्या शुभमनवर सलामीची जबाबदारी आहे. जेसनच्या जागी रहमानुल्लाह गुरबाज संघात सामिल झाला आहे. पण त्याला आयपीएलचा खास अनुभव नसल्याने त्याच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.   


यष्टीरक्षकाचाही दुष्काळ


आयपीएलमधील बहुतांश संघामध्ये भारतीय क्रिकेटमधील किमान दोन यष्टीरक्षक आहेत. पण गुजरातकडे केवळ रिद्धिमान साहा हा एकमेव भारतीय यष्टीरक्षक असल्याने त्याला दुखापत झाल्यास पर्याय नाहीये. ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू वेड हा संघात आहे पण त्याचा फिटनेस आणि फॉर्म यावरच त्याची संघातील जागा फिक्स होईल.


असा आहे गुजरातचा संघ -


शिलेदार – हार्दिक पंड्या (15 कोटी), राशिद खान (15 कोटी) शुभमन गिल (8 कोटी), मोहम्मद शमी (6.25 कोटी), जेसन रॉय (2 कोटी), लॉकी फर्ग्युसन (10 कोटी), अभिनव सदरंगानी (2.6 कोटी), राहुल तेवातिया (9 कोटी), नूर अहमद (30 लाख), साई किशोर (3 कोटी), डॉमनिक ड्रेक्स (1.10 कोटी), जयंत यादव (1.70 कोटी), विजय शंकर (1.40 कोटी), दर्शन नालकंडे (20 लाख), यश दयाल (3.20 कोटी), अल्झारी जोसेफ (2.40 कोटी), प्रदीप सांगवान (20 लाख), मॅथ्यू वेड (2.40 कोटी), वृद्धिमान साहा – (1.90 कोटी), डेविड मिलर – ( 3 कोटी),  वरुण अरॉन- 50 (लाख रुपये), गुरकीरत मान सिंह- (50 लाख रुपये), नूर अहमद – (30 लाख रुपये), साईं सुदर्शन- 20 लाख रुपये


हे ही वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha