Covid Outbreak in IPL : आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) हंगामावर देखील आता कोरोनाचं सावट गडद होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाचे (DC) फिजियो पॅट्रिक फरहार्ट यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता आणखी एका खेळाडूला देखील कोरोनाची बाधा झाल्याने दिल्ली संघाने आगामी सामन्यासाठी पुण्याला जाणं रद्द केलं आहे. तसंच संपूर्ण संघाला विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. क्रिकबज या वेबसाईटने याबाबत वृत्त दिलं असून संबधित खेळाडूची आरटी-पीसीआर (RT-PCR) टेस्ट देखील केली जाणार आहे.



मागील वर्षी अर्थात 2021 मध्ये कोरोना महामारीमुळे आयपीएल 2021 चा हंगाम 4 मे 2021 रोजी अर्ध्यातूनच थांबवावा लागला होती. त्यानंतर उर्वरित आयपीएल सामने दुबईमध्ये घेण्यात आले होते. 2021 मध्ये सनराइजर्स हैदराबाद (SRH) चा विकेटकीपर ऋद्धिमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अमित मिश्रा यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर आयपीएलचे सामने स्थगित कऱण्यात आले होते. 2021 मध्ये 29 लीग सामने झाल्यानंतर बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यानंतर बीसीसीआयने उर्वरित सामने दुबईमध्ये खेळवले होते.   तर कोरोना महामारीमध्ये 2020 चा हंगामही दुबईत झाला होता.  


दिल्लीचा पुढील सामना 20 एप्रिलला


ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीचा पुढील सामना बुधवारी 20 एप्रिल रोजी पुण्यातील एमसीए मैदानात खेळवला जाणार आहे. पंजाब किंग्स विरुद्ध हा आयपीएल 2022 मधील 32 वा सामना असणार आहे. त्यासाठी संघ आज पुण्याला रवाना होणार होता. पण खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याने वेळापत्रकात आता बदल करण्यात येणार आहे.


हे देखील वाचा-