Ambati Rayudu: इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2022) चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळणारा भारतीय फलंदाज अंबाती रायडूनं काही वेळापूर्वी हा त्याचा शेवटचा आयपीएल हंगाम असेल, असं ट्वीट केलं होतं. रायडूनं त्याच्या निवृत्तीबद्दल ट्विट करताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झाला. पण काही वेळातच रायडूनं त्याची पोस्ट डिलीट केली. ज्यामुळं अंबाती रायडूच्या डोक्यात चाललंय तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
रायडूनं ट्विटमध्ये काय लिहलं होतं?
“हा माझा शेवटचा आयपीएलचा हंगाम असेल हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. या लीगमध्ये खेळताना आणि 13 वर्षांपासून 2 मोठ्या संघांचा एक भागासह खूप चांगला वेळ घालवला आहे. या अद्भुत प्रवासासाठी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्जचे मनापासून आभार मानायला आवडेल."
सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांचं स्पष्टीकरण
सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे की, अंबाती रायडू निवृत्त होत नाहीये. कदाचित तो त्याच्या कामगिरीवर खूश नसेल. ही फक्त एक मानसिक गोष्ट आहे. तो त्याचा आयपीएलचा प्रवास चेन्नईसोबत सुरू ठेवेल. सीएसकेच्या सीईओच्या या विधानामुळं हे स्पष्ट होते की रायुडू अद्याप निवृत्त होत नाही. परंतु त्यानं ही पोस्ट का केली? हा प्रश्न आहे ज्याचं उत्तर अद्याप मिळालेले नाही.
रायडूची आयपीएलमधील कामगिरी
रायुडूनं आयपीएलमध्ये आतापर्यंत 187 सामने खेळले आहेत आणि 29 च्या सरासरीनं 3 हजार 290 धावा केल्या आहेत. यंदाच्या हंगामात रायडूला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानं 12 सामन्यात केवळ 271 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-
- आयपीएलच्या कारकिर्दितील 100 वा सामना खेळण्यासाठी श्रेयस अय्यर सज्ज, कसा होता केकेआरच्या कर्णधाराचा प्रवास?
- IPL 2022: वीरेंद्र सेहवागनं सांगितला चेन्नईचा 'फ्यूचर कॅप्टन', रवींद्र जाडेजा नव्हे तर 'या' खेळाडूचं घेतलं नाव!
- IPL 2022 Playoffs Prediction: गुजरातसह 'हे' तीन संघ प्लेऑफमध्ये पोहचणार, वसीम जाफरची भविष्यवाणी