IPL 2021 : कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यायची की, नाही? हा सर्वस्वी निर्णय खेळाडूंचा : BCCI
भारतीय केंद्र शासनानं 18 वर्षांवरील वयोगटात येणाऱ्या सर्व नागरिकांच्या लसीकरणास मान्यता दिल्यानंतर, 1 मेपासून लसीकरणाच्या या नव्या टप्प्याला सुरुवात होणार आहे.
IPL 2021 : भारतीय केंद्र शासनानं 18 वर्षांवरील वयोगटात येणाऱ्या सर्व नागरिकांच्या लसीकरणास मान्यता दिल्यानंतर, 1 मेपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या या नव्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. हा टप्पा नेमका कसा असेल, नेमकं किती लसीकरण यामध्ये केलं जाणार याचीच अनेकांना उत्सुकता असताना आता आयपीएलच्या 14 व्या हंगामात सहभागी झालेल्या क्रिकेट खेळाडूंच्या लसीकरणाबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडेच सर्वांचं लक्ष लागलं होतं.
याचसंदर्भात बीसीसीआयच्या हवाल्यानं अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ज्याअंतर्गत लस घ्यायची की नाही, याचा निर्णय बीसीसीआयनं सर्वस्वी खेळाडूंवरच सोडला. सर्वांसाठी लसीकरण सुविधा सुरु झाल्यानंतर लस घ्यायची की नाही याचा निर्णय खेळाडू घेऊ शकतात, अशी माहिती सुत्रांचा हवाला देत एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलं आहे. शनिवारपासून भारतीय खेळाडूंसाठी लसीकरण प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
सध्याच्या घडीला भारता असणारे ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड संघातील खेळाडू पाहता त्यांनाही लसीकरण मोहिमेत सहभागी करुन घेतलं जाणार का असं, विचारलं असता फक्त भारतीय खेळाडूच या मोहिमेचा भाग असतील असंही स्पष्ट करण्यात आलं.
काही खेळाडूंची आयपीएलमधून माघार
आयपीएलमधून राजस्थानच्या संघाकडून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज अँड्र्यू टाय यानं काही खासगी कारणं देत या स्पर्धेतून माघार घेतली आहे. कोरोनाची लाट भारतात भयावह वळणावर असतानाच त्यानं हा निर्णय घेतला. इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएलमध्ये फ्रँचायझीकडून मोठ्या प्रमाणात पैसा उधळला जात आहे. याचवेळी देशात वैद्यकिय सुविधांअभावी अनेकांना जीव गमवावा लागत आहे, ही दाहक परिस्थिती पाहता टायनं याबाबत नाराजीही व्यक्त केली. तर, भारतीय खेळाडू रविचंद्रन अश्विन यानंही आयपीएल स्पर्धेतून काढता पाय घेतल्याचं पाहायला मिळालं.