कोलकाता : इंडियन प्रीमियर लीगचा तेरावा सीझन 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. परंतु आयपीएलच्या सामन्यांची अधिकृत यादी आणि वेळापत्रक अद्याप जारी केलेलं नाही. मात्र आयपीएलची यादी शुक्रवारी म्हणजेच 4 सप्टेंबर रोजी जारी केली जाईल, अशी माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी एबीपी न्यूजला दिली. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे यंदा यूएईमध्ये आयपीएलचं आयोजन केलं आहे.
चेन्नई सुपर किंग्जच्या दोन खेळाडू आणि 11 सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआयने सामन्यांची संपूर्ण यादी जाहीर केली नव्हती. शिवाय सगळे संघही संपूर्ण वेळापत्रकाची वाट पाहत आहेत. आता सौरभ गांगुली यांनी एबीपी न्यूजला सांगितलं की, बीसीसीआय शुक्रवारी संपूर्ण यादी संघांना कळवेल. ही यादी आज तयार होईल, अशी आशा आहे.
खेळाडू आणि प्रेक्षकही आयपीएलच्या शेड्यूलची प्रतीक्षा करत आहेत. उद्घाटन सामना आणि अंतिम सामन्याच्या तारखांची घोषणा आधीच झाली आहे. त्यानुसार 19 सप्टेंबर रोजी उद्घाटन सामना आणि 10 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
आयपीएलचा तेरावा मोसम 19 सप्टेंबरपासून 10 नोव्हेंबरदरम्यान खेळवण्यात येणार आहे. याची घोषणा होताच सर्व संघ संयुक्त अरब अमीरातला पोहोचले आहेत. चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाप कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आल्यानंतर संघाचा क्वॉरन्टाईन कालावधी एक आठवड्याने वाढला. चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू वगळता सर्व खेळाडू सराव करत आहेत.
आयपीएल टूर्नामेंट तीन ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. 21 सामने दुबईत, 21 अबू धाबी आणि शारजाहमध्ये 14 सामने, अशाप्रकारे आयपीएल 2020 मध्ये एकूण 56 ग्रुप सामन्यांचं वाटप करण्यात करण्यात आलं आहे. आता संपूर्ण शेड्यूल आल्यानंतरच कोणता संघ कोणाविरुद्ध आणि कधी सामना खेळणार हे स्पष्ट होईल.