मुंबई : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या पहिल्या मोसमाचा विजेता संघ राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दुबईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या 13 सीझनमध्ये अष्टपैलू बेन स्टोक्स खेळणार की नाही याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. बेन स्टोक्सचे वडील कॅन्सरशी झुंज देत असून तो सध्या वडिलांसोबत न्यूझीलंडमध्ये आहे.


पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका मध्यात सोडून बेन स्टोक्स न्यूझीलंडला रवाना झाला होता. मागील आठवड्यात स्टोक्सने वडिलांना मेंदूचा कर्करोग झाल्याचं सांगितलं होतं. वडिलांना कॅन्सर झाल्याचं समजल्यानंतर एक आठवडा झोप लागली नव्हती, असंही तो म्हणाला होता.


स्टोक्स म्हणाला की "वडिलांना मेंदूचा कर्करोग असल्याचं समजताच मला काहीच सूचत नव्हतं. मी एक आठवडा झोपू शकलो नाही. माझी मनस्थिती अतिशय वाईट होती, त्यामुळे कसोटी मालिका मध्यात सोडून न्यूझीलंडला जाणं मला योग्य वाटलं.''


यामुळेच बेन स्टोक्स पाकिस्तानविरुद्धच्या ट्वेण्टी-20 मालिकेतही खेळला नाही. तसंच ऑस्ट्रेलियाआणि इंग्लंड यांच्यात शुक्रवारपासून तीन सामन्याच्या ट्वेण्टी-20 मालिकेतही तो खेळणार नाही. याशिवाय ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात खेळवल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेलाही बेन स्टोक्स मुकणार आहे.


सध्याच्या परिस्थिती बेन स्टोक्स यूएईमध्ये संघात सहभागी होणंही कठीण असल्याचं दिसत नाही. जर स्टोक्स यूएईमध्ये पोहोचला तरी त्याला कोविड-19 च्या प्रोटोकॉलनुसार एक आठवड्यासाठी क्वॉरन्टाईन राहावं लागेल. अशा स्थितीत स्टोक्स आयपीएलच्या सुरुवातीच्या सामान्यांमध्ये खेळू शकणार नाही हे जवळपास निश्चित आहे.


दरम्यान राजस्थान रॉयल्सने अद्याप बेन स्टोक्सबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. संपूर्ण चित्र स्पष्ट झाल्यानंतरच राजस्थान रॉयल्सकडून स्टोक्सच्या जागी बदली खेळाडूची घोषणा होऊ शकते.