Ravi Shastri on IPL: भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टी-20 क्रिकेटबाबत मोठे वक्तव्य केलंय. "आयपीएलनं क्रिडाविश्वावर एक वेगळीच छाप सोडली आहे. ज्यामुळं द्विपक्षीय टी-20 क्रिकेटला आता काही महत्त्व उरलं नाही. विश्वचषकातच टी-20 क्रिकेट खेळले पाहिजे. कारण, द्विपक्षीय मालिका कोणाच्याच लक्षात राहत नाही. यामुळं आयपीएलच्या सामन्यांच्या संख्येत वाढ केली पाहिजे, तसेच आयपीएलची स्पर्धा वर्षात दोन वेळा झाली पाहिजे", अशी इच्छा रवी शास्त्री यांनी व्यक्त करून दाखवली आहे. 


रवी शास्त्री काय म्हणाले?
ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना रवी शास्त्री यांनी टी-20 क्रिकेटबाबत लक्ष वेधून घेणारं वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांच्यासोबत डॅनियल व्हिटोरी, इयान बिशप आणि आकाश चोप्रा देखील उपस्थित होते. रवी शास्त्री म्हणाले की, " जगभरात अनेक द्विपक्षीय टी-20 सामने खेळले जात आहेत.माझ्या 6-7 वर्षांच्या प्रशिक्षणात मला विश्वचषकाशिवाय एकही द्विपक्षीय टी-20 सामना आठवत नाही. विश्वचषक जिंकणारा संघ लोकांच्या लक्षात राहतो. त्यामुळं आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये केवळ विश्वचषक स्पर्धा खेळण्यात यावी", असं रवी शास्त्री म्हणाले.


शास्त्रींनं दिलं फुटबॉलचं उदाहरण
"टी-20 क्रिकेट देखील फुटबॉलसारखेच असले पाहिजे. जिथे फ्रँचायझी क्रिकेट सोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर फक्त विश्वचषक खेळला जावा. जगभरातील अनेक देश आपपल्या देशात  फ्रँचायझी टी-20 स्पर्धेचं आयोजन करते. ही चांगली गोष्ट आहे. तर, दर दोन वर्षांनी विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते", असंही शास्त्रींनी म्हटलं आहे. 


दरम्यान, रवी शास्त्री यांच्या वक्तव्यावर आकाश चोपडा आणि डेनियल व्हिटोरीनं सहमती दर्शवली. भविष्यात आयपीएल खूप मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाईल. एवढेच नव्हेतर, आयपीएलची स्पर्धेचं वर्षात दोनदाही आयोजन केलं जाऊ शकतं, असं मत त्यांनी व्यक्त केलं. 


हे देखील वाचा-