Indian Premier League 2023: क्रीडाप्रेमींचं लक्ष सध्या एकाच गोष्टीकडे आहे. ते म्हणजे, कधी एकदा त्यांचा लाडका बुमराह मैदानात उतरतोय आणि त्याची वाऱ्याची गतीपेक्षाही वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पुन्हा मैदानात परतण्याची तमाम क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2023 च्या सीझनमध्ये तो फिट होऊन परतेल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती, पण आता समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, जयप्रीत बुमराह (Jasprit Bumrah Health Update) कदाचित आयपीएलमध्ये (IPL 2023) खेळू शकणार नाही. आयपीएलच्या संपूर्ण सीझनमधून बुमराह बाहेर राहू शकतो. 


जसप्रीत बुमराह सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये गोलंदाजीचा सरावही करतोय. काही दिवसांपासून बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या 2 सामन्यांमध्ये खेळताना दिसेल, असं बोललं जात होतं. परंतु सिलेक्टर्सनी त्याच्या फिटनेसच्या आधारे कोणतीही जोखीम न घेता त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुढच्या दोनही कसोटी सामन्यांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 


पाठीच्या दुखण्यामुळे बुमराह संघाबाहेर


गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकापूर्वी बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान खेळला होता. पण त्यानंतर पाठीच्या दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर पडावं लागलं होतं. आता जवळपास 8 महिने उलटून गेले आहेत. अशातच बुमराहच्या फिटनेसबद्दल समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, तो आयपीएल 2023 च्या सीझनमधून पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. परंतु क्रिकबझच्या एका बातमीनुसार, जयप्रीत बुमराह संपूर्ण सीझनमधून बाहेर राहण्याची जास्त शक्यता आहे. 


बुमराहशिवाय मैदानात उतरणार 'मुंबई इंडियन्स'?


जसप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्सचा एक अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे. बुमराह म्हणजे, मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. संघातील गोलंदाजांमध्ये बुमराह नसल्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी ही मोठी पोकळी ठरु शकते. त्याचा परिणाम नक्कीच संघाच्या गोलंदाजीवर झाल्याचं पाहायला मिळेल. तसं, पाहायला गेलं तर मुंबई इंडियन्समधील बुमराहची जागा कोणीच घेऊ शकत नाही. त्यामुळे जरी फ्रँचायझीने बुमराहच्या जागी एखाद्या दुसऱ्या खेळाडूची निवड केली, तर हा पर्याय कितपत यशस्वी ठरेल ही शंकाच आहे. 


दरम्यान, मुंबई इंडियन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. जोफ्रा आर्चर, जो फिट नसल्यामुळे गेल्या मोसमात संपूर्ण हंगामासाठी बाहेर होता, आगामी हंगामात बुमराहच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजीसाठी संघासाठी फायदेशीर ठरू शकतो.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


India vs Australia 3rd Test Indore : इंदूर कसोटीत टीम इंडियाची 'सत्वपरीक्षा'; कांगारुची साथ देऊ शकते लाल मातीची धावपट्टी