IPL 2023 : 'जर तुम्ही धोनीचं ऐकाल तर...', चेन्नईच्या दिमाखदार विजयानंतर पाहा काय म्हणाला रहाणे
IPL 2023 CSK Ajinkya Rahane : ईडन गार्डन्सच्या मैदानावर झालेल्या रंजक सामन्यात चेन्नईने 49 धावांनी दिमाखदार विजय मिळवला. या सामन्यातील विजयाचा खरा हिरो फलंदाज अजिंक्य रहाणे ठरला.
CSK vs KKR, IPL 2023 : आयपीएल 2023 मध्ये 33 व्या सामन्यात चेन्नईने कोलकातावर मात केली. ईडन गार्डन्सच्या मैदानावर झालेल्या या रंजक सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 49 धावांनी दिमाखदार विजय मिळवला. या सामन्यातील विजयाचा खरा हिरो फलंदाज अजिंक्य रहाणे ठरला. रहाणेने 29 चेंडूंमध्ये 71 धावांची नाबाद खेळी केली. पहिल्यांजा फलंदाजी करताना चेन्नईने कोलकाता संघासमोर 236 धावांचं आव्हान दिलं. लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकात्याचा संघ 20 षटकात आठ गमावून फक्त 186 धावांपर्यंतच मजल मारु शकला. चेन्नईकडून तुषार देशपांडे आणि महिश तिक्ष्णा यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. जेसन रॉय आणि रिंकू सिंह यांनी अर्धशतकी खेळी केली, पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.
प्रथम फलंदाजी करताना अजिंक्य रहाणे, डेवेन कॉनवे आणि शिवम दुबे यांच्या अर्धशतकाच्या बळावर चेन्नईने 235 धावांचा डोंगर उभारला होता. या सामन्यात अजिंक्य रहाणेची शानदार खेळी पाहायला मिळाली. रहाणेने गेल्या काही सामन्यांमध्ये धावांचा पाऊस पाडल्याचं दिसून आलं आहे. आयपीएल 2023 मध्ये मागील पाच सामन्यांमध्ये, अजिंक्य रहाणेने 52.25 च्या सरासरीने आणि 199.04 च्या आश्चर्यकारक स्ट्राइक रेटने 209 धावा केल्या आहेत. त्याने दोन अर्ध्या धावा केल्या आहेत.
दरम्यान, अजिंक्य रहाणेनं सामन्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. रहाणेनं सांगितलं की, फक्त खेळायचं आहे ही एक स्पष्ट मानसिकता होती. जर तुमच्या डोकं आणि तुमचं मन चांगल्या स्थिती असेल तर तुम्ही चांगला खेळ करु शकता. मी फक्त माझ्या खेळाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत आहे. विकेट थोडी कठीण होती, पण एकदा तुम्ही आत आलात तर तुम्हाला चांगली संधी आहे. आमची सुरुवात चांगली झाली होती आणि त्यानंतर मला माझे शॉट्स खेळायचे होते आणि गती कायम ठेवायची होती. मी आतापर्यंतच्या माझ्या सर्व खेळीचा आनंद घेतला आहे, पण मला अजूनही वाटतं की माझी सर्वोत्तम खेळी अजून झालेली नसून ती होणं अजून बाकी आहे.
याशिवाय रहाणेनं चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्त्वाचं कौतुक केलं आहे. रहाणे यावेळी म्हणाला की, 'मी भारतासाठी माही भाई (MS Dhoni) च्या हाताखाली बरीच वर्षे खेळलो आहे आणि आता चेन्नई संघामध्ये देखील खूप चांगलं शिकायला मिळत आहे. धोनी जे काही म्हणतो ते तुम्ही ऐकल्यास, तुम्ही बरेचदा तुमच्या अपेक्षेपेक्षाही चांगला खेळ करु शकता.'